Join us  

ICC World Cup 2023 : भारतातील २ शहरं पाकिस्तानला 'सुरक्षित' वाटतात; वर्ल्ड कपचे सामने तेथेच खेळण्यावर भर

ICC World Cup 2023 :  वर्ल्ड कप ५ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि स्पर्धेत फायनलसह ४६ सामने खेळवले जातील.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 5:39 PM

Open in App

ICC World Cup 2023 :  वर्ल्ड कप ५ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि स्पर्धेत फायनलसह ४६ सामने खेळवले जातील.  हे सामने भारतातील १२ शहरांमध्ये खेळवले जाऊ शकतात. यामध्ये अहमदाबाद, लखनौ, मुंबई, राजकोट, बंगळुरू, दिल्ली, इंदूर, मोहाली, गुवाहाटी आणि हैदराबादची नावे आहेत. २०२३ ICC क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघ चेन्नई आणि कोलकाता येथे आपले बहुतांश सामने खेळू शकतो. या दोन्ही शहरांमध्ये संघाला अधिक सुरक्षित वाटते. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट संघाचे सामने या शहरांमध्येच आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या सूत्रांच्या हवाल्याने PTI ने वृत्त दिले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे उच्च अधिकारी आयसीसीच्या सर्वोच्च कार्यकारिणीच्या संपर्कात असल्याने याविषयी चर्चा सुरू असल्याचे समजते. एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, "बीसीसीआय आणि भारत सरकारच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून आहे, परंतु पर्याय दिल्यास, पाकिस्तान आपले बहुतेक सामने कोलकाता आणि चेन्नईमध्ये खेळण्यास प्राधान्य देईल." पाकिस्तानने २०१६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा सामना कोलकाता येथे खेळला आणि तेथील सुरक्षेमुळे खेळाडू खूप खूश होते. त्याचप्रमाणे चेन्नई हे देखील पाकिस्तानसाठी संस्मरणीय ठिकाण आहे.

२०१६मध्ये, पहिला भारत-पाकिस्तान सामना धर्मशाला येथे होणार होता, परंतु विरोधामुळे तो कोलकाता येथे हलवण्यात आला. अशा परिस्थितीत या दोन देशांना धर्मशाला आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये स्पर्धा करणे कठीण आहे. मुंबईत पाकिस्तानच्या सामन्यांना शिवसेना नेहमीच विरोध करत आली आहे. भारत-पाकिस्तान सामना कोणत्या शहरात होणार हा प्रश्न आहे. अहमदाबादमध्ये १.३२ लाख प्रेक्षक बसू शकतात आणि यामुळे आयसीसीला जास्तीत जास्त कमाईची संधी मिळेल. मात्र फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असेल, तर दुसऱ्या शहराबाबत निर्णय होऊ शकतो. प्रत्येक संघ साखळी टप्प्यात नऊ सामने खेळणार आहे. यावेळी ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार आहे.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयसीसीभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App