ICC World Cup 2023 : भारतात जाऊन वर्ल्ड कप जिंकण्याचा दावा करणारे पाकिस्तानी चक्क अफगाणिस्तान संघाला घाबरलेले दिसत आहेत. BCCI ने भारतीय संघाला आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) नाटकं सुरू केली. आधी वर्ल्ड कप स्पर्धेवरच बहिष्कार घालण्याची पोकळ धमकी त्यांनी दिली, परंतु BCCI सह ICC नेही भिक न घातल्याने त्यांनी माघार घेतली. पण, त्यानंतर भारताविरुद्ध अहमदाबाद येथे न खेळण्याचा मुद्दा त्यांनी मांडला. तोही डाव उलटला आणि आता त्यांनी अफगाणिस्तानचा आधार घेत मागणी केली आहे.
बीसीसीआयने सादर केलेल्या ड्राफ्ट नुसार पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना चेन्नईत,तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळुरूत होणार आहे. पण, अफगाणिस्ताची फिरकी गोलंदाजी पाहून पाकिस्तानने चेन्नईच्या वळणाऱ्या खेळपट्टीवर अफगाणिस्ताविरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा सामना चेन्नईत, तर अफगाणिस्ताचा सामना बंगळुरूत खेळवण्याची मागणी केली. त्यात आता आणखी एक विचित्र मागणी त्यांनी केली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी सराव सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यास रस नसल्याचे PCB ने ICC ला कळवले आहे. त्यांना सराव सामन्यात बिगर आशियाई संघासोबत खेळायचे आहे. आशिया चषक स्पर्धेत आशियाई संघासोबत खेळणार असल्याने त्यांनी ही मागणी केल्याचे वृत्त Geo News ने दिले आहे.
PCB ने या संदर्भात आयसीसीला पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी अफगाणिस्तान व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल करण्याची मागणी केली आहे. शिवाय भारतीय संघाचा फायदा बघूनच वेळापत्रक बनवल्याचा दावाही त्यांनी केलाय. ड्राफ्ट नुसार १५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान लढत अहमदाबाद येथे होणार आहे. पाकिस्तान ६ आणि १२ ऑक्टोबर रोजी क्वालिफायरमधून प्रगती करणाऱ्या दोन संघांविरुद्ध आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( २० ऑक्टोबर, बंगळुरू), अफगाणिस्तान ( २३ ऑक्टोबर) आणि दक्षिण आफ्रिका ( २७ ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध चेन्नईत सामना होईल. बांगलादेश (३१ ऑक्टोबर, कोलकाता), न्यूझीलंड ( ५ नोव्हेंबर, बंगळुरू) आणि इंग्लंड ( १२ नोव्हेंबर, कोलकाता) येथे पाकिस्तानचे सामने होतील.