ind vs aus | अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या बहुचर्चित लढतीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. असे असतानाही भारताच्या डावादरम्यान एक प्रेक्षक नियमांचे उल्लंघन करत मैदानावर विराट कोहलीच्या जवळ गेला अन् खळबळ माजली. संबंधित प्रेक्षकाने हातात पॅलेस्टाईनचा झेंडा घेतला होता, ज्याच्यावर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम असून फायनलच्या सामन्यासाठी सव्वा लाख प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली आहे. अशातच एक व्यक्ती मैदानात गेल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये घबराट पसरली होती. त्या व्यक्तीने पॅलेस्टाईनचे समर्थन करणारा मुखवटा आणि टी-शर्ट घातले होते. टी-शर्टवर स्टॉप बॉम्बिंग पॅलेस्टाईन आणि फ्री पॅलेस्टाईन, असा आशय लिहण्यात आला होता.
मैदानात प्रवेश केल्यानंतर त्या व्यक्तीने विराट कोहलीजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. हे पाहून मैदानात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून बाहेर नेले. अंतिम सामन्यादरम्यान मैदानात घुसलेल्या व्यक्तीला अहमदाबादच्या चांदखेडा पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्यात नेले आणि अटकेची कारवाई केली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की, माझे नाव जॉन आहे... मी ऑस्ट्रेलियाचा रहिवासी आहे. विराट कोहलीला भेटण्यासाठी मी मैदानात उतरलो होतो. मी पॅलेस्टाईनचे समर्थन करतो आहे.