India's Playing XI vs NZ : भारत-न्यूझीलंड हे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन अपराजित संघ रविवारी समोरासमोर असणार आहेत. धर्मशाला येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) दुखापत झाली आणि ३ चेंडू टाकून तो मैदानाबाहेर गेला तो गेलाच.. हार्दिक न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताला किवींविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे. यातच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी हार्दिकची परफेक्ट रिप्लेसमेंट जाहीर केली आहे. त्यांनी किवींविरुद्धची प्लेइंग इलेव्हनच जाहीर केली आहे.
शशी थरूर यांनी ट्विट केले की, 'हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. भारतीय संघ रविवारी धर्मशाला येथे हा सामना खेळणार आहे, परंतु हार्दिकच्या जागी खेळण्यासाठी संघात एकही चांगला अष्टपैलू खेळाडू नाही, त्यामुळे भारताला संतुलन राखावे लागेल. भारतीय संघात दोन बदल गरजेचे आहेत. शार्दूलच्या जागी मोहम्मद शमी संघात घेतला पाहिजे, तर हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली पाहिजे. या सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन खेळवायला हवी, कारण हा सामना साखळी फेरीतील अव्वल संघ ठरवणार आहे.'