ICC World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) आता नवीन ड्रामा सुरू केला आहे. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सुरुवातीला अहमदाबाद येथे यजमानांविरुद्ध खेळणार नाही, असा ड्रामा करणाऱ्या PCB चं नवीन नाटक सुरू झालं आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेचा तिढा सुटल्यानंतर पाकिस्तानचा संघ आता भारतात वर्ल्ड कपसाठी येईल असाच अंदाज होता. पण, आता PCB प्रमुख नजम सेठी यांनी नवा पेच निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत.. पाकिस्तान सरकार जर परवानगी देणार असतील तर आम्ही वर्ल्ड कप खेळायला भारतात जाऊ, असे म्हणणे त्यांनी सुरू केले आहे.
पाकिस्तान संघाचे भारतात येणे अजूनही निश्चित नाही. पाकिस्तान सरकारने परवानगी दिल्यानंतर भारतात वर्ल्ड कप खेळायला येऊ, असे सेठी यांनी सांगितले. तसेच त्यांनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे ड्राफ्ट वेळापत्रकही मान्य केलेले नाही. ''वर्ल्ड कप वेळापत्रकाला आम्ही अद्याप मंजुरी किंवा नामंजुरी दिलेली नसल्याचे आम्ही आयसीसीला लेखी कळवले आहे. भारतात जायचे की नाही, याचा निर्णय आमचं सरकार घेईल. भारतातही पाकिस्तानात जायचे की नाही हा निर्णय त्यांची सरकार घेते. त्यामुळे अहमदाबाद येथे खेळणार का, हे आम्हाला विचारण्यात काहीच अर्थ नाही,''असे सेठी म्हणाले.
''आम्ही जायचं की नाही, हे प्रथम आम्ही ठरवू, त्यानंतर आमचे सरकार आम्ही कुठे जायचं याचा निर्णय घेईल. या दोन परिस्थितींवर सर्व अवलंबून आहे,''असेही त्यांनी म्हटले. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वन डे वर्ल्ड कप होणार आहे. भारत-पाकिस्तान यांची मॅच १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होईल अशी जोरदार चर्चा आहे.