मुंबई : अफगाणिस्तानच्या संघाने यंदाच्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. इंग्लंडसारख्या गतविजेत्या संघाला पराभूत करून अफगाणिस्तानने मोठा उलटफेर केला. लक्षणीय बाब म्हणजे अफगाणिस्तानचा संघ अद्याप उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या मजबूत संघांना पराभवाची धूळ चारली. उद्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अफगाणिस्तानच्या कॅम्पची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) याची झलक शेअर केली आहे.
दरम्यान, पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विश्वचषकात आणखी एक उलटफेर करण्यात अफगाणिस्तानला यश येते का हे पाहण्याजोगे असणार आहे. आयसीसीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सचिन तेंडुलकरसोबत भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा आणि जोनाथन ट्रॉट दिसत आहे.
'करा किंवा मरा'चा सामना
उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्हीही संघांसाठी उद्याचा सामना 'करा किंवा मरा' असा असणार आहे. कारण विजेता संघ उपांत्य फेरीकडे कूच करेल तर पराभूत संघाच्या अडचणीत वाढ होईल. आताच्या घडीला ऑस्ट्रेलियन संघ (१०) गुणांसह तिसऱ्या तर अफगाणिस्तान (८) गुणांसह सहाव्या स्थानावर स्थित आहे.
Web Title: icc world cup 2023 Sachin Tendulkar pays the Afghanistan camp a visit ahead of AFG vs AUS clash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.