ICC World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायचं की नाही, याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) तळ्यातमळ्यात आहेत. पाकिस्तानच्या आडमुठेपणामुळे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक उशीरा जाहीर झालं. भारत-पाकिस्तान हा बहुप्रतिक्षित सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. हैदराबाद, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता या पाच शहरांमध्ये पाकिस्तानचे सामने होणार आहेत. पण, अद्यापही पाकिस्तान संघाचे वर्ल्ड कप खेळणे निश्चित नाही आहे. PCB कडून नखरे झाल्यानंतर आता पाकिस्तानचे क्रीडा मंत्री एहसान माझरी यांच्या विधानाची चर्चा रंगलीय.
पाकिस्तानकडे आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद होतं, परंतु बीसीसीआयने नकार दिल्यावर ही स्पर्धा दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. त्यावरून क्रीडा मंत्र्यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, ''जर भारताने आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा हट्ट धरला, तसाच वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपण मागणी करायला हवी.'' पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर क्रीडा मंत्र्यांच्या या विधानाने पाकिस्तानच्या सहभागाविषयी शंका निर्माण झाली आहे.
पाकिस्तान आला नाही तर कोण?भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेणारे १० संघ निश्चित झाले आहे. भारतासह बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान यांनी आधीच वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित केली होती. उर्वरित दोन जागांसाठी झिम्बाब्वे येथे १० देशांमध्ये पात्रता स्पर्धा रंगली. श्रीलंका आणि नेदरलँड्स यांनी बाजी मारली. पाकिस्तान न आल्यास सुपर सिक्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला स्कॉटलंडचा संघ भारतात खेळण्यासाठी पात्र ठरेल. स्कॉटलंडने पात्रता स्पर्धेत दमदार कामगिरी करून दाखवली आहे.