अत्यंत बेभरवशी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजनं तगड्या ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली आहे. डेव्हीड वॉर्नर, अरॉन फिन्च, उस्मान ख्वाजा आणि ग्लेन मॅक्सवेल या रथी-महारथींना एकापाठोपाठ एक तंबूचा रस्ता दाखवत विंडीजच्या गोलंदाजांनी धमाकाच केला आहे. वर्ल्ड कपमधील आपल्या पहिल्या सामन्यातही त्यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली होती.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील १०व्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि खतरनाक वेस्ट इंडीज आमनेसामने उभे ठाकले आहेत. ट्रेन्ट ब्रीज मैदानावर होत असलेल्या या सामन्यात विंडीजनं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली आहे. कर्णधाराचा हा निर्णय शेल्डन कॉट्रेल, ऑशाने थॉमस आणि आंद्रे रसेल या त्रिकुटानं योग्य ठरवला. थॉमसनं फिन्चला सहा धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये कॉट्रेलनं डेव्हीड वॉर्नरचा अडथळा दूर केला. उस्मान ख्वाजा थोडा स्थिरस्थावर होत असतानाच, आंद्रे रसेलनं त्याला चकवलं आणि मॅक्सवेलला तर कॉट्रेलनं भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे ७.४ षटकांत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ३८ अशी झाली.
वेस्ट इंडिजने 'मिशन वर्ल्ड कप'ला सुरुवात करताना पाकिस्तानला केवळ १०५ धावात गारद करीत सात गड्यांनी विजय नोंदविला होता. या सामन्यात ओशाने थॉमसने २७ धावांत चार गडी बाद केले होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर सात गड्यांनी विजय नोंदवला होता.
Web Title: ICC World Cup: Australia are in all sorts of trouble against West Indies as 4 star batsmen are out back to back
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.