वनडे वर्ल्ड कपचा थरार अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना रंगणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वच्या सर्व १० सामने जिंकले असल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र भारतासमोर अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान असल्याने कांगारुंना कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी आयसीसीकडून शुक्रवारी रात्री अंपायर्सची घोषणा करण्यात आली. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी रिचर्ड इलिंगवर्थ आणि रिचर्ड केटलबोरो यांची नेमणूक केली आहे. हे दोन्हीही अंपायर्स प्रचंड अनुभवी असले तरी भारतासाठी मात्र ते काहीसी 'अनलकी' ठरले आहेत. त्यामुळेच रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी अंपायर म्हणून त्यांचं नाव समोर आल्यानंतर भारतीय चाहत्यांची धडधड वाढली आहे.
भारतीय संघाने २०११ मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. मात्र त्यानंतर आयसीसीकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये भारताला अपयशाचा सामना करावा लागला. २०१३ नंतर भारत तब्बल आठवेळा आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत दाखल झाला होता आणि विशेष म्हणजे त्यातील सात सामन्यांमध्ये रिचर्ड केटलबोरो हे अंपायर्स पॅनलमध्ये सहभागी होते.
कोणकोणत्या सामन्यांचा समावेश?
रिचर्ड केटलबोरो हे २०१४ मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका टी-ट्वेंटी वर्ल्ड फायनल, २०१५ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे वर्ल्ड कप सेमीफायनल, २०१७ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि २०१९ मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड या सेमीफायनल सामन्यासाठी मैदानी अंपायर होते. तसंच भारत पराभूत झालेल्या आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दोन अंतिम सामन्यांत केटलबोरो हे टीव्ही अंपायर म्हणून काम पाहात होते.
दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्र्लिया या अंतिम सामन्यासाठी निवड झालेले दुसरे अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ हेदेखील भारतासाठी फारसे लकी ठरलेले नाहीत. भारतीय संघ अपयशी ठरलेल्या मागील आठपैकी तीन बाद फेरीतील सामन्यात इलिंगवर्थ हेही मैदानी अंपायर होते.
अंतिम सामन्यात कोणत्या संघाचं पारडं जड?
वर्ल्ड कप स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवत भारतीय संघाने चौथ्यांदा फायनलमध्ये धडक दिली आहे. दुसरीकडे स्पर्धेच्या सुरुवातीला अडखळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने नंतर मात्र दमदार कामगिरी केल्याने भारतासमोर कठीण आव्हान असणार आहे. भारताच्या फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलं असून संघातील वेगवान गोलंदाजही भेदक मारा करत आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियनच्या वेगवान गोलंदांजांनाही सूर सापडला असून त्यांनी सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Web Title: ICC World Cup Final 2023 ind vs aus Indian fans worried after reading umpires names
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.