IND vs AUS Final mach updates | अहमदाबाद : वन डे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अंतिम सामना अविस्मरणीय करण्यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयने जय्यत तयारी केली. सामन्याला सुरूवात होण्याआधी भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने मैदानावर एअर शो केला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेजलवुड.
२००३ चा बदला घेणार? रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकून १८ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, उपांत्य फेरीत बलाढ्य न्यूझीलंडला ७० धावांनी पराभवाची धूळ चारून यजमान संघाने फायनलचे तिकिट मिळवले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला बाहेरचा रस्ता दाखवून ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद येथे फायनल खेळण्याचा मार्ग मोकळा केला. तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होत असून २० वर्षांचा बदला घेण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे.