ICC ODI World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादला पोहोचला आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघ बुधवारी रात्री भारतात पोहोचला. पाकिस्तान क्रिकेट संघ ७ वर्षांनंतर भारतात आला आहे. याआधी २०१६ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम भारतात आली होती. ५ ऑक्टोबरपासून वन डे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. दुबईत ९ तासांच्या विश्रांतीनंतर पाकिस्तानचा संघ भारतात पोहोचला. पाकिस्तानला २९ सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. यानंतर ३ ऑक्टोबरला दुसरा सराव सामना ऑस्ट्रेलियाशी होईल आणि त्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातून मोहिमेला सुरुवात करेल.
हैदराबादमध्ये पोहोचताच पाकिस्तानने भारतापुढे विशेष मागणी ठेवली आहे. पाकिस्तानला राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सराव करणार आहे आणि सध्या हैदराबादमध्ये फेस्टिव्हल सुरू असल्याने टीमला फारशी सुरक्षा मिळू शकणार नाही. अशा स्थितीत संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संघाला सकाळी ८ ते १२ या वेळेत सकाळचे सत्र मिळाले असून यादरम्यान संघाला सराव करावा लागणार आहे. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट संघाने खास फिरकीपटूंची मागणी केली आहे.
हैदराबादची खेळपट्टी फिरकीपटूंना खूप मदत करते हे पाकिस्तान संघाला माहीत आहे. अशा परिस्थितीत संघाने अव्वल दर्जाच्या फिरकीपटूंना सराव सत्रात उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. संघाला जास्तीत जास्त फिरकीपटू खेळवायचे आहेत. याशिवाय न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या संघांना सरावासाठी प्रत्येकी ७ खेळपट्ट्या देण्यात येणार आहेत. या खेळपट्ट्यांवर दोन्ही संघांचे फलंदाज आणि गोलंदाज सराव करतील.