ICC World Cup Qualifier : भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. आयसीसीने वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या ८ संघानी वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. उर्वरित दोन संघांसाठी झिम्बाब्वे येथे पात्रता स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे माजी वर्ल्ड कप विजेते संघ मुख्य फेरीत सहज प्रवेश मिळवतील असे वाटले होते, परंतु सद्यस्थिती काही वेगळीच आहे. १९७५ व १९७९ साली वर्ल्ड कप उंचावणारा वेस्ट इंडिजचा संघ मुख्य स्पर्धेत पात्र ठरणार नाही, अशी स्थिती आहे.
वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेचा आता सुपर सिक्स टप्पा सुरू झाला आहे, परंतु पात्र ठरलेल्या ६ संघांच्या खात्यात वेगवेगळे गुण आहेत. श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचे प्रत्येकी ४ गुण आहेत. या दोन्ही संघांनी त्यांच्या गटांतून सुपर सिक्ससाठी पात्र ठरलेल्या दोन संघांना पराभूत करून हे गुण कमावले आहेत. नेदरलँड्स आणि स्कॉटलंड यांच्या खात्यात प्रत्येकी दोन गुण आहेत. पण, शून्य गुण असलेला वेस्ट इंडिजचा संघ पात्र ठरेल का, हा चर्चेचा विषय ठरला. वेस्ट इंडिजची स्पर्धेतील सुरूवात काही खास झालेली नाही. त्यांना झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सकडून हार पत्करावी लागली.
वेस्ट इंडिज सध्यातरी स्पर्धेबाहेर दिसत असले तरी अंकगणितानुसार ते अद्याप शर्यतीत आहेत. ते ओमान किंवा श्रीलंका यांच्याविरुद्ध जरी पराभूत झाले तर ते चार गुणांसह अन्य चार संघाना आव्हान देऊ शकतील. दुसऱ्या स्थानासाठी आता नेट रन रेट महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांनी उर्वरित ३ सामने जिंकले तर मुख्य फेरीत पात्र ठरण्याचे चान्स वाढतील, परंतु त्यांना तरीही अन्य निकालांवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यांना श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्या दोन पराभवांची प्रतीक्षा असेल. या दोन्ही संघांचेही प्रत्येकी ३ सामने शिल्लक आहेत. त्यांनी ३पैकी दोन सामने जिंकल्यास त्यांचे ८ गुण होतील आणि ते वर्ल्ड कपसाठी पात्र ठरतील.
त्यांनी दोन सामने गमावल्यास आणि इतर कोणत्याही संघाचे ६ गुण झाल्यास वेस्ट इंडिजचं सर्व गणित नेट रन रेटवर अवलंबून असेल. सध्या श्रीलंका २.६९८ नेट रन रेटसह अव्वल स्थानाही आहे. झिम्बाब्वेचा नेट रन रेट ०.९८ आहे.