ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेची वर्ल्ड कप स्पर्धेच्या दिशेने सुरू असलेल्या स्वप्नवत वाटचाल काल थांबली.. स्कॉटलंडने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद करताना झिम्बाब्वेला स्पर्धेबाहेर फेकले. श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रता निश्चित केली आहे. दुसऱ्या स्थानासाठी झिम्बाब्वेचा संघ आघाडीवर होता, परंतु स्कॉटलंडच्या विजयाने झिम्बाब्वेचा मार्ग रोखला गेला. नेदरलँड विरुद्ध स्कॉटलंड यांच्यातला विजेता वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करेल. भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत १० शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.
वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांचे समान ६ गुण आहेत, तरीही झिम्बाब्वेचा संघ स्पर्धेबाहेर कसा गेला, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. पण, नेट रन रेटच्या जोरावर स्कॉटलंडने बाजी मारलीय. स्कॉटलंडचा ०.२९६ असा नेट रन रेट आहे, तर झिम्बाब्वेचा नेट रन रेट -०.०९९ असा आहे. सुपर सिक्समध्ये ४ पैकी ३ सामने झिम्बाब्वेने जिंकले आहेत, तेवढेच सामने स्कॉटलंडनेही जिंकले आहेत. त्यांचा आणखी एक सामना शिल्लक आहे. नेदरलँड्ससोबत त्यांचा सामना आहे. नेदरलँड्सचे ४ गुण आहेत आणि त्यांनाही मोठा विजय मिळवून ६ गुणांसह वर्ल्ड कप पात्रता निश्चित करण्याची संधी आहे. त्यामुळे स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स हा सामना निर्णायक आहे.
स्कॉटलंड - सुपर सिक्समध्ये तीन विजयासह स्कॉटलंडच्या खात्यात ६ गुण आहेत, ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे नेदरलँड्सविरुद्ध विजय किंवा ड्रॉ हा निकाल स्कॉटलंडसाठी पुरेसा आहे. जरी ते पराभूत झाले, तरी नेट रन रेटच्या जोरावर ते पात्र ठरू शकतील, परंतु त्यातही ते ३० धावांहून अधिक धावांनी पराभूत झाल्यास त्यांचा पत्ता कट होऊ शकतो.
नेदरलँड्स - ४ गुणांसह हा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी स्कॉटलंडवर ३०+ धावांनी किंवा धावांचा पाठलाग करताना ६ षटकं राखून विजय मिळवल्यास ते नेट रन रेटच्या जोरावर वर्ल्ड कप खेळू शकतील.