ICC World Cup Qualifier : १९७५ व १९७९ मध्ये वन डे वर्ल्ड कप उंचावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळता येणार नाही. झिम्बाब्वे, नेदरलँड्स यांच्यापाठोपाठ वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत त्यांना स्कॉटलंडकडून आज पराभव पत्करावा लागला. सुपर सिक्स गटात झिम्बाब्वे आणि श्रीलंका हे प्रत्येकी ६ गुणांसह आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या खात्यात अजूनही शून्य गूण आहेत. त्यामुळे त्यांचे वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. आज स्कॉटलंडसमोर तर त्यांनी सपशेल गुडघे टेकले.
झिम्बाब्वे आणि श्रीलंकेच्या घोडदौडीमुळे वेस्ट इंडिजला सुपर सिक्समध्ये प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे होते. पण, आज स्कॉटलंडसमोरही त्यांनी नांगी टाकल्या. जॉन्सन चार्ल्स व शामार्ह ब्रूक यांना ब्रँडन मॅक्म्युलेन याने खाते उघडूच दिले नाहीत. कर्णधार शे होप ( १३) व कायले मेयर्स ( ५) यांनाही संघाला सावरता आले नाही. सलामीवीर ब्रेंडन किंग २२ धावांवर मॅक्म्युलेनला विकेट देऊन माघारी परतला अन् बघता बघता विंडीजचा निम्मा संघ ६० धावांत तंबूत गेला. निकोलस पूरन ( २१) याच्या फॉर्मने आज पाठ फिरवली. अनुभवी जेसन होल्डर ( ४५) व रोमारियो शेफर्ड ( ३६) यांनी चांगली खेळी करून विंडीजची लाज वाचवली. पण, स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी आज बाजी मारली अन् विंडीजला १८१ धावांत गुंडाळले.
स्कॉटलंडच्या मॅक्म्युलेनने ३ विकेट्स घेतल्या, तर ख्रिस सोल, मार्क वॅट व ख्रिस ग्रिव्ह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी जी कमाल करून दाखवली, तिच वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांकडून अपेक्षा होती. पण, तसं झाले नाही. सलामीवीर ख्रिस्तोफर मॅकब्राईड भोपळ्यावर माघारी परतला, परंतु मॅथ्यू क्रॉस व ब्रेंडन मॅक्म्युलेन यांनी शतकी भागीदारी करताना वेस्ट इंडिजचा पराभव पक्का केला. या दोघांनी १७५ चेंडूंत १२५ धावांची भागीदारी केली. मॅक्म्युलेन १०६ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ६९ धावांवर बाद झाला. क्रॉस आणि जॉर्ज मुन्सी यांची ३७ धावांची भागीदारी अकिल होसैनने तोडली, परंतु विंडीजच्या हातून सामना गेला होता. स्कॉटलंडने ७ विकेट्स राखूने विजय पक्का केला. क्रॉसने नाबाद 74 धावा केल्या अन् स्कॉटलंडने 43.3 षटकांत सामना जिंकला.
Web Title: ICC World Cup Qualifier : WEST INDIES ARE OUT FROM THE 2023 WORLD CUP IN INDIA, The two-time winners lost to a weak Scotland
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.