ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी ओमान विरूद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला. ३७ वर्षीय सीन विलियम्सने आणखी एक शतकी खेळी करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला सिकंदर रझा व ल्युक जाँग्वे यांची साथ मिळाली. ओमानने अखेरच्या षटकापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळे त्यांचे मनोबल नक्की उंचावले असेल. झिम्बाब्वेचा सलग सातवा विजय ठरला.
प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने ७ बाद ३३२ धावांचा डोंगर उभा केला. जॉयलॉर्ड गुम्ब्ले ( २१) व कर्णधार क्रेग एर्व्हिन ( २५) हे फार काही करू शकले नाही. विलियम्सने १०३ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १४२ धावांची खेळी केली. सिकंदरने ४२ आणि जाँग्वेने नाबाद ४३ धावा चोपून संघाला मोठा पल्ला गाठून दिला. प्रत्युत्तरात ओमानचा सलामीवीर कश्यप प्रजापतीने शतक झळकावले. त्याने ९७ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १०३ धावा चोपल्या. अकिब इलियास ( ४२) याची त्याला चांगली साथ मिळाली. आयान खान ४७ धावा करून माघारी परतला अन् ओमानला घरघर लागली.
झिशान मक्सूद आणि मोहम्मद नदीम यांनी चांगली फटकेबाजी केली. रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेलेला कर्णधार मक्सूद पुन्हा फलंदाजीला आला अन् संघाच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या. १२ चेंडूंत ३२ धावा ओमानला करायच्या होत्या, परंतु रिचर्ड नागराव्हाने दोन धावा दिल्या अन् सामना ६ चेंडू ३० धावा असा अशक्य झाला. ओमानने ९ बाद ३१८ धावा केल्या आणि झिम्बाब्वेने १४ धावांनी सामना जिंकला.
सुपर सिक्स फेरीतील हा त्यांचा पहिलाच विजय ठरला अन् त्यांच्या खात्यातील गुणसंख्या एकूण ६ अशी झाली. आता उर्वरित दोन सामन्यांपैकी १ जिंकून ते वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. झिम्बाब्वेच्या विजयाने वेस्ट इंडिजचा मार्ग रोखला आहे.