ICC World Cup Qualifier ZIMvsWI : आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत शनिवारी धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ २६८ धावांत तंबूत पाठवल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ ही मॅच सहज जिंकेल असे वाटले होते. पण, घडले भलतेच... झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून विंडीजचा पराभव करून सुपर सिक्समध्ये प्रवेश केला. झिम्बाब्वेने अ गटात तीनही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे.
झिम्बाब्वेचे वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडिजसमोर २६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सिकंदर रझा ( ६८), रायन बर्ल ( ५०) आणि क्रेग एर्व्हिन ( ४७) यांची चांगली खेळी. जॉयलॉर्ड गुम्बीए ( २६) आणि कर्णधार एर्व्हिन यांनी ६३ धावांची सलामी दिली. पण, मधल्या फळीला अपयश आल्याने विंडीजने सामन्यावर पकड घेतली. एर्व्हिनने सीन विलियम्स ( २३)ला सोबतीला घेऊन डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु हे दोन्ही अनुभवी फलंदाज माघारी परतले. मागील सामन्यात झिम्बाब्वेकडून सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या सिकंदरने पुन्हा एकदा उपयुक्त खेळी केली. त्याने ५८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६८ धावा चोपल्या. बर्ल ५० धावांवर माघारी परतला अन् झिम्बाब्वेचे शेपूट विंडीजने गुंडाळले. किमो पॉलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
ब्रेंडन किंग आणि कायले मेयर्स यांनी विंडीजला चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु किंग्स २० धावांवर माघारी परतला अन् डाव उलटला. कर्णधार शे होप ( ३०), निकोलस पूरन ( ३४) हे मागील सामन्यातील शतकवीर मोठी खेळी करू शकले नाही. रोस्टन चेसने ४४ धावा केल्या, मेयर्स ५६ धावांवर माघारी परतला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. विंडीजचा संपूर्ण संघ २३३ धावांत तंबूत परतला अन् झिम्बाब्वेने ३५ धावांनी सामना जिंकला तेंदाई चताराने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ब्लेसिंग, रिचर्ड व सिकंदर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.