ICC World Cup Qualifiers 2023 : दुबळ्या ओमानने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सोमवारी बलाढ्य आयर्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आज नेदरलँड्सने कमाल करून दाखवली. नेपाळवर पहिल्या सामन्यात विजयाची नोंद करणाऱ्या झिम्बाब्वेची आज नेदरलँड्सने धुलाई केली. प्रथम फलंदाजील आलेल्या नेदरलँड्सने धावांचा पाऊस पाडताना वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्येची नोंद केली. आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्सकडून दमदार कामगिरी करणाऱ्या सिकंदर रझाची आज बेक्कार धुलाई केली. त्याने ४ विकेट्स घेतल्या खऱ्या, परंतु एवढ्या विकेट्स घेण्यासाठी सर्वाधिक धावा खर्च करण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.
नेदरलँड्सचे सलामीवीर मॅक्स ओ'डाऊड व विक्रम सिंग यांनी १२० धावांची सलामी दिली. सिकंदर रझाने या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. मॅक्स ५९ धावांवर बाद झाला. वीस्ली बारेस ( ४) अपयशी ठरला, परंतु स्कॉट एडवर्डने विक्रम सिंगला चांगली साथ दिली. विक्रमने १११ चेंडूंत ८८ धावांची खेळी केली, तर स्कॉटने ७२ चेंडूंत ८३ धावा चोपल्या. साकिब जुल्फिकारने नाबाद ३४ धावांची खेळी करून संघाला ६ बाद ३१५ धावांपर्यंत पोहोचवले.
सिकंदरने ५५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. झिम्बाब्वेकडून वन डे क्रिकेटमध्ये ४ विकेट्ससाठी सर्वाधिक धावा देणारा तो फिरकीपटू ठरला. यापूर्वी २००९मध्ये प्रॉस्पर उत्सेयाने ( वि. केनिया) ४६ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या, तर २००१ मध्ये ग्रँड फ्लॉवरने ( वि. भारत) ४४ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या. नेदरलँड्सने दुसऱ्यांना ३१५ धावांचा टप्पा गाठला. यापूर्वी २००७मध्ये बर्म्युडाविरुद्ध त्यांनी ८ बाद ३१५ धावा केल्या होत्या. २००३ मध्ये नामिबियाविरुद्ध ४ बाद३१४ धावा आणि २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध ३०६ धावा त्यांनी चोपल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने ८ षटकांत बिनबाद ४१ धावा केल्या आहेत.