ICC World Cup Qualifiers: आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजची 'पात्रता' घसरलेली पाहायला मिळतेय... आधी झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्यानंतर सोमवारी नेदरल्ँडसनेही माजी विजेत्यांचा गेम केला. ३७४ धावा उभ्या करूनही विंडीजला नेदरलँड्सचे वादळ रोखता आले नाही. नेदरलँड्सने हातचा गेलेला सामना खेचून आणला अन् बरोबर ३७४ धावा करून मॅच सुपर ओव्हरमध्ये नेली. ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट जेसन होल्डरकडे Super Over ची जबाबदारी दिली गेली, परंतु नेदरलँड्सच्या लोगन व्हॅन बिक ( Logan van Beek) याने ४,६,४,६,६,४ अशा ३० धावा चोपल्या, मग गोलंदाजांनी कमाल करताना विंडीजला ८ धावा करू दिल्या आणि दोन विकेट्स घेत थरारक विजय मिळवला.
निकोलस पूरनच्या नाबाद १०४ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने पात्रता फेरीत नेदरलँड्सविरुद्ध ५ बाद ३७४ धावा केल्या. ब्रेंडन किंग ( ७६), जॉन्सन कार्लोस ( ५४), कर्णधार शे होप ( ४७) आणि किमो पॉल ( ४६*) यांनी दमदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरात नेदरलँड्सकडून सुरुवातीला मोठी खेळी झाल्या नसल्या तरी प्रत्येक खेळाडूने योगदान दिले. विक्रमजीत सिंग ( ३७), मॅक्स ओ'डाऊड ( ३६), विस्ली बेरेसी ( २७) आणि बॅड डे लीड ( ३३) या आघाडीच्या चौघांनी छोट्या खेळी केली. तेजा निदामनुरूने ७६ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह १११ धावा चोपल्या. त्याला कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने ६७ धावांची साथ दिली.
लोगन व्हॅन बिक ( २८) व आर्यन दत ( १४) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करून संघाला ५० षटकांत ९ बाद ३७४ धावांपर्यंत पोहोचवले अन् मॅच बरोबरीत आणून ठेवली. सुपर ओव्हरमध्ये लोगन व्हॅन बिक्सने ३० धावा चोपून जेसन होल्डरची बोलती बंद केली. त्यानंतर गोलंदाजीतही बिकने ८ धावा देताना दोन विकेट्स मिळवत नेदरलँड्सला थरारक विजय मिळवून दिला.