ICC World Test Championship 2023 Final - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी मोठी घोषणा केली. आयसीसीजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ ची अंतिम लढत ओव्हल क्रिकेट मैदानावर होणार आहे, तर २०२५ ची फायनल ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणार आहे. WTC च्या पहिल्या पर्वाची फायनल २०२१मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात साऊहॅम्टन येथे झाली होती आणि न्यूझीलंडने कसोटी वर्ल्ड कप जिंकला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यंदाही अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे आणि त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३च्या गुणतालिकेतील अव्वल दोन संघ जेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. ओव्हल मैदानावर २००४ व २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळवण्यात आली होती. सध्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन संघ WTC Standings मध्ये अव्वल दोन क्रमांकावर आहेत. पण, भारतीय संघाला संधी आहे. २०२५च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल लॉर्ड्सवर होईल. येथे २०१९मध्ये वन डे वर्ल्ड कपची ऐतिहासिक फायनल झाली होती. ''पुढील वर्षी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा मान ओव्हलला देताना आम्हाला आनंद होत आहे,''असे ICCचे मुख्य कार्यकारी जेफ अॅलार्डायस यांनी जाहीर केले.
भारत फायनलमध्ये कसा प्रवेश करणार?
- ऑस्ट्रेलिया सर्वाधिक ७० टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे. ६० टक्क्यांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहेत. श्रीलंका आणि भारत अनुक्रमे ५३.३३ व ५२.०८ टक्क्यांसह तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. न्यूझीलंडने WTC चे जेतेपद नावावर केले होते.
- भारतीय संघ डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे , तर फेब्रुवारी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. जून ३०मध्ये जागतिक कसोटी स्पर्धा संपतेय. सध्या भारतीय संघ ५२.०८ टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यांना उर्वरित सहा कसोटी जिंकाव्या लागतील, तर भारताची टक्केवारी ६८.०६ इतकी होईल.