ओव्हल : बुधवारपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्हीही संघांची प्लेइंग इलेव्हन लक्षणीय आहे. भारताने केवळ एक फिरकीपटू मैदानात उतरवला आहे, तर चार वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवला. ऑस्ट्रेलियाने मात्र एक अतिरिक्त फिरकीपटू खेळवला आहे. अशातच कर्णधार रोहित शर्माने रवीचंद्रन अश्विनला न खेळवल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
"भारताची सर्वात मोठी चूक"सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले. पहिल्या दिवसाअखेर कांगारूच्या संघाची धावसंख्या ८५ षटकांत ३ बाद ३२७ एवढी आहे. स्टीव्ह स्मिथ (९५) आणि ट्र्रॅव्हिस हेड (१४६) खेळपट्टीवर टिकून आहेत अर्थात ते नाबाद आहेत. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ४३ धावा करून बाद झाला. तर उस्मान ख्वाजाला खाते देखील उघडता आले नाही. मार्नस लाबूशेनचा २६ धावांवर मोहम्मद शमीने त्रिफळा काढला. भारताकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
प्लेइंग XI मध्ये 'कसोटी'भारतीय संघ ६ फलंदाज, ४ गोलंदाज आणि एका अष्टपैलू फिरकीपटूसह रिंगणात आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनकडे पाहिले तर, कांगारूच्या संघाने बाजी मारल्याचे दिसते. ऑस्ट्रेलियाच्या संघात ५ फलंदाज, २ अष्टपैलू, १ फिरकीपटू आणि ३ वेगवान गोलंदाज आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि कॅमेरून ग्रीन हे अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेत आहेत. ग्रीन वेगवान गोलंदाजी करू शकतो तर हेडमध्ये फिरकी गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. ट्वेंटी-२० मध्ये देखील फिरकी गोलंदाजी करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला इथेही गोलंदाजी करायला मिळेल यात शंका नाही. एकूणच भारत १ आणि ऑस्ट्रेलिया २ फिरकीपटूंसह मैदानात आहे. लक्षणीय बाब म्हणजे शार्दुल ठाकूरमध्ये फलंदाजी करण्याची क्षमता असल्याने त्याला संघात स्थान दिले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक पातळीवर अव्वल स्थानी असलेल्या अश्विनला बाकावर बसवल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवाय अश्विनला न खेळवणे ही भारताची सर्वात मोठी चूक असल्याचे त्याने म्हटले आहे. "या ओव्हलच्या खेळपट्टीवर जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा खेळपट्टीत बदल होत जाईल. ऑस्ट्रेलियाकडे त्यांच्या लाइनअपमध्ये बरेच डाव्या हाताने खेळणारे फलंदाज आहेत. यांचा सामना करणे अश्विनला नक्कीच आवडले असते. मला वाटते की ही भारताची सर्वात मोठी चूक होती", असे पाँटिंगने आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये सांगितले.