Ajinkya Rahane Six, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 3: भारताचा मराठमोळा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली. भारताचा संघ संकटात असताना रहाणेने दमदार अर्धशतक ठोकत संघाची लाज राखली. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना, खूप मार खाल्ला. ट्रेव्हिस हेडचे दीडशतक आणि स्टीव्ह स्मिथचं शतक याच्या बळावर पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी निराशा केली. पण अजिंक्य रहाणेने मात्र दुहेरी विक्रमाचा धमाका केला.
अजिंक्य रहाणे जेव्हा खेळायला आला त्यावेळी भारताची अवस्था अगदीच बिकट होती. तो मैदानात असताना विराट कोहली बाद झाला. त्यानंतर रविंद्र जाडेजासोबत त्याची भागीदारी झाली. जाडेजा आणि भरत बाद झाल्यावर रहाणे दुसरा मराठमोळा खेळाडू शार्दुल ठाकूरची साथ घेतली आणि डाव पुढे सुरू ठेवला. त्याने दमदार षटकार मारत अर्धशतक ठोकले. पॅट कमिन्सला बाऊन्सर चेंडूवर थप्पड मारत त्याने अर्धशतक पूर्ण केले.
विक्रमाचा डबल धमाका
कसोटी विश्वविजेतेपदाच्या फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो भारताचा पहिला अर्धशतकवीर ठरला. WTC 2021 मध्ये भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावा केल्या होत्या. पण यावेळी मात्र त्याने अर्धशतक पूर्ण केले. तसेच डावात पुढे जात, अजिंक्यने टेस्ट क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा टप्पाही गाठला.
--
त्याआधी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. दोघे स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलियाने दोघांना बरोबर अडकवले. कर्णधार रोहित हाफ पिच चेंडूवर २६ चेंडूत १५ धावांवर बाद झाला. तर शुबमन गिल चेंडू सोडून देताना, स्विंगने त्याला वेडं बनवलं. स्कॉट बोलंडचा बाहेरचा चेंडू सोडताना चेंडू आत आला आणि त्याचा स्टंप उडवला. अगदी तसाच पुजारादेखील बाद झाला. पुजारा शांत व संयमीपणे खेळत होता. पण २५ चेंडूंवर १४ धावांवर खेळताना त्याने चेंडू सोडला आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मिचेल स्टार्कच्या बाऊन्सर चेंडूवर विराट कोहली १४ धावांवर झेलबाद झाला. रहाणे आणि जाडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली होती, पण जाडेजा ४८ धावांवर माघारी परतला. त्यामुळे १५०च्या आतच भारताने निम्मा संघ गमावला. पाठोपाठ भरतही ५ धावांवर बाद झाला.