Ajinkya Rahane Cameron Green catch, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 3: टीम इंडियाचा मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे याने १८ महिन्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आणि दमदार पुनरागमन केले. भारतीय संघ संकटात असताना अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली. कसोटी विश्वविजेतेपद फायनलच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा अजिंक्य पहिला भारतीय ठरला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पाही गाठला. पण शतकाने मात्र अजिंक्यला हुलकावणी दिली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेचा कॅमेरॉन ग्रीनने अफलातून झेल टिपला.
अजिंक्यने संधी मिळताच पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली. भारताचा संघ संकटात असताना रहाणेने दमदार अर्धशतक ठोकत संघाची लाज राखली. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना, खूप मार खाल्ला. त्यानंतर भारतीय फलंदाजांच्या वरच्या फळीनेही निराशा केली. पण अजिंक्य रहाणेने मात्र संघासाठी शानदार ८९ धावांची खेळी केली. आधी रविंद्र जाडेजा आणि नंतर शार्दुल ठाकूर या दोघांच्या साथीने त्याने संघाला २५०च्या पार नेले. तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र त्याने उत्तम खेळून काढले. त्यात त्याला १-२ वेळी जीवनदानही मिळाले. पण लंचटाइमच्या नंतर मात्र रहाणेला नशिबाची साथ लाभली नाही. पॅट कमिन्सच्या चेंडूवर रहाणेच्या बॅटच्या कडेला लागून चेंडू उडला. हवेत वेगाने चेंडू जात असतानाच कॅम ग्रीनने चपळाईन हवेत झेप घेतली आणि संघाला एक मोठे यश मिळवून दिले. पाहा व्हिडीओ-
अजिंक्य बाद होण्याआधी रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांकडून भारताची खराब सुरूवात केली. कर्णधार रोहित २६ चेंडूत १५ धावांवर, तर शुबमन गिल १३ धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली दोघेही प्रत्येकी १४-१४ धावा करून माघारी परतले. रहाणे आणि जाडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली होती, पण जाडेजा ४८ धावांवर बाद झाला. त्यामुळे १५०च्या आतच भारताने निम्मा संघ गमावला. पाठोपाठ भरतही ५ धावांवर बाद झाला. रहाणे आणि शार्दुल यांच्यात १०९ धावांची भागीदारी गेली. त्यानंतर रहाणे माघारी परतला.