WTC Final 2023 IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघेही आपल्या पहिल्या कसोटी विश्वविजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहेत. दोन्ही संघांचे खेळाडू ओव्हलवर पोहोचले असून या मोठ्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. तशातच ऑस्ट्रेलियाने एक मोठ्ठा 'गेम' करत भारतीय संघाला धक्का दिला आहे. त्यांनी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये एका स्टार कोचला स्थान दिले आहे.
कोण आहे 'नवा भिडू'
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि त्याच्या काळातील फलंदाज अँडी फ्लॉवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला साथ देणार आहे. तो ऑस्ट्रेलियन संघात सल्लागार म्हणून सामील झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अँडी फ्लॉवर यापूर्वी इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. अशा परिस्थितीत त्याला इंग्लंडची स्थिती आणि तिची मनस्थिती चांगलीच ठाऊक आहे, ज्याचा पुरेपूर फायदा कांगारूंच्या संघाला होताना दिसेल. सोमवारी ओव्हलच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाने सराव केला. त्याचा सराव अँडी फ्लॉवरच्या देखरेखीखाली झाला. फ्लॉवरने सराव सत्रादरम्यान ऑस्ट्रेलियन संघासोबतचे आपले इंग्लंडबद्दलचे अनुभवही शेअर केले.
अँडी फ्लॉवर ऑस्ट्रेलियाचा सल्लागार बनला आहे. अँडी फ्लॉवर सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियन टीमशी संबंधित आहे. पण एक सल्लागार म्हणून तो यापुढेही ऑस्ट्रेलियन संघात दिसू शकतो. ऑस्ट्रेलियाला फलंदाजीत त्याचा फायदा होईल. अँडी फ्लॉवरच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांने मोलाचे मार्गदर्शन मिळेल. झिम्बाब्वेचा माजी सलामीवीर स्वत: त्याच्या काळातील एक दमदार फलंदाज होता. त्याने झिम्बाब्वेसाठी 63 कसोटीत 51 पेक्षा जास्त सरासरीने 4794 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी फायद्याचाच ठरेल असे बोलले जात आहे.