भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कालच्या ६ बाद ९० धावांवरून आजचा खेळ सुरू करणारा भारतीय संघ १२४ धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंडनं या विजयानंतर ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 120 गुणांची कमाई करताना तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
दुसऱ्या डावात मयांक अग्रवाल अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टनं त्याला ३ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर पृथ्वी शॉ ( १४) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. कॉलीन डी ग्रँडहोमनं टीम इंडियाचा कर्णधार विराटला ( १४) पायचीत केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळ दाखवला. पण, रहाणे ( ९) आणि पुजारा ( २४) हे दोघेही माघारी परतले. टीम इंडियानं दिवसअखेर ६ बाद ९० धावा करताना ९७ धावांनी आघाडी वाढवली होती. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांना खिंड लढवायची होती, परंतु तेही अपयशी ठरले. भारताच्या तळाच्या चार फलंदाजांना तिसऱ्या दिवशी केवळ ३४ धावा जोडता आल्या. भारताचा दुसरा डाव १२४ धावांत गडगडला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी केवळ १३२ धावांचे आव्हान ठेवण्यात टीम इंडियाला यश आले. ट्रेंट बोल्टने चार आणि टीम साऊदीने ३ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी पहिल्या विकेटसाठी भक्कम भागीदारी करताना टीम इंडियाचा पराभव निश्चित केला. लॅथमला 52 धावांवर उमेश यादवनं माघारी पाठवलं. त्यानंतर आलेला केन विलियम्सनही ( 5) लगेच बाद झाला. ब्लंडलने 55 धावांच्या खेळीत 8 चौकार व 1 षटकार खेचले. त्याला जसप्रीत बुमराहनं बाद केले. न्यूझीलंडने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला प्रथमच व्हाईटवॉश स्वीकारावा लागला आहे. कर्णधार म्हणून हा विराटचाही पहिलाच व्हाईटवॉश आहे.
न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली
टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम