ICC World Test Championship Points Table: Sri Lanka vs Pakistan 2nd Test : श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर २४६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. पहिल्या कसोटीत विक्रमी धावांचा पाठलाग करून मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या पाकिस्तान संघाला दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने जमिनीवर आणले. ५०८ धावांचे अशक्य लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेवल्यानंतर प्रभात जयसूर्या ( Prabath Jayasuriya ) व रमेश मेंडिस ( Ramesh Mendis) या फिरकीपटूंनी श्रीलंकेला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे पाकिस्तानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे, परंतु टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे.
पहिल्या डावात श्रीलंकेने ३७८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात त्यांनी पाकिस्ताचा पहिला डाव २३१ धावांवर गुंडाळला. रमेश मेंडीसने ४७ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर प्रभात जयसूर्याने ३ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने दुसरा डाव ८ बाद ३६० धावांवर डाव घोषित करून ५०८ धावांचे लक्ष्य ठेवले. इमान-उल-हक ( ४९) व कर्णधार बाबर आजमने पाकिस्तानचा डाव सावरला. मोहम्मद रिझवान ( ३७) बाद झाल्यानंतर पाकिस्तानची गाडी घसरली. बाबरने १४६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ८१ धावा करताना सामना ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला होता. पण, जयसूर्याने त्याला पायचीत केले. रमेश मेंडिसने १०१ धावांत ४, तर जयसूर्याने ११७ धावांत ५ विकेट्स घेताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ २६१ धावांवर तंबूत पाठवला आणि श्रीलंकेला २४६ धावांनी विजय मिळवून दिला.
पहिल्या तीन कसोटींत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये प्रभात जयसूर्याने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या नरेंद्र हिरवानी यांनी त्यांच्या कारकीर्दिच्या पहिल्या तीन कसोटींत ३१ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या चार्ली टर्नर यांनी २९ आणि श्रीलंकेच्या प्रभातने २९ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने हा विजय मिळवून WTC 2021-23 points table मध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली, तर पाकिस्तानची पाचव्या स्थानी घसरण झाली. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर कामय राहिला आहे.
भारतीय संघ अजून सहा कसोटी सामने खेळणार आहे.. बांगलादेश दौऱ्यावर दोन, तर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार असे सहाही कसोटी सामने जिंकून भारताला अंतिम फेरीत पुन्हा प्रवेश मिळवण्याची संधी आहे. WTC च्या पहिल्या पर्वात भारताला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.