ENG vs WI 3rd Test, ICC World Test Championship points table: एकीकडे टीम इंडियाने टी२० मध्ये श्रीलंकेविरूद्ध २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेट मालिकेत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला. ३ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली. तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा १० गडी राखून पराभव केला. अवघ्या तीन दिवसांत संपलेल्या या तिसऱ्या कसोटीनंतर विश्व कसोटी अजिंक्यपद ( WTC 25 ) मध्ये इंग्लंडने गुणतालिकेत दमदार कामगिरी केली. भारतीय संघ मात्र आपले अव्वल स्थान राखून आहे. जाणून घेऊया २९ जुलैला अपडेट झालेली ताजी गुणतालिका-
इंग्लंड सहाव्या स्थानी
तिसऱ्या सामन्यात प्रथम वेस्ट इंडिजने २८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात १७५ धावाच करता आल्या. त्यानंतर इंग्लंडने ८२ धावांचे लक्ष्य एकही गडी न गमावता पार केले. ३-० असा मालिका विजय मिळवल्यानंतर इंग्लंड गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. इंग्लंडने WTC 2023-25 या स्पर्धेत आतापर्यंत १३ कसोटी खेळल्या आहेत. त्यात इंग्लंडच्या नावे ६ विजय आणि ६ पराभव आले तर एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे इंग्लंडच्या विजयाच्या गुणांची टक्केवारी ३६.५४ असून त्यांचे ५७ गुण आहेत.
वेस्ट इंडिज तळाशी
वेस्ट इंडिजच्या संघाचा दारूण पराभव झाल्याने ते आता नवव्या स्थानी आहेत. वेस्ट इंडिजकडे केवळ १६ गुण असून विजयाच्या गुणांची टक्केवारी १९.०५ इतकी कमी आहे. WTC 2023-25 या स्पर्धेत आतापर्यंत वेस्ट इंडिजने ७ कसोटी सामने खेळले असून त्यात केवळ एकात विजय मिळवला आहे. ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर उर्वरित कसोटी अनिर्णित राहिली.
टीम इंडिया अव्वलस्थानी कायम!
भारतीय संघाने WTC 2023-25 मध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. त्यात भारताला ६ सामन्यात विजय तर २ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. १ सामना अनिर्णित राहिला. भारताचे एकूण गुण ७४ असून विजयाच्या गुणांची टक्केवारी ६८.५२ आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे गुण भारतापेक्षा जास्त म्हणजे ९० आहेत, पण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील क्रमवारी ही विजयाच्या गुणांच्या टक्केवारीवर ठरते. त्यात ऑस्ट्रेलिया केवळ ६२.५० टक्केच विजय मिळवू शकला असल्याने तो दुसऱ्या स्थानी आहे.