दुबई - ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या सत्राची अंतिम लढत ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ११ ते १५ जून २०२५ दरम्यान रंगेल,’ अशी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी केली. या निर्णायक सामन्यासाठी आयसीसीने १६ जून २०२५ रोजी राखीव दिवस ठेवला आहे.जागतिक क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर पहिल्यांदाच डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल. याआधी, या स्पर्धेचे दोन अंतिम सामने साऊथम्पटन (२०२१) आणि ओव्हल (२०२३) येथे रंगले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २०२१ मध्ये न्यूझीलंड, तर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले होते.
डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारत व ऑस्ट्रेलिया अव्वल दोन स्थानी आहेत. अंतिम सामन्यासाठी स्थान भक्कम करण्याच्या निर्धाराने भारत यंदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भिडेल. न्यूझीलंड (तिसरे स्थान), इंग्लंड (चौथे), दक्षिण आफ्रिका (पाचवे), बांगलादेश (सहावे) व श्रीलंका (सातवे) हेही अंतिम फेरीसाठी प्रयत्नशील आहेत.