श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघातील खेळाडू मोठ्या ब्रेकवर आहेत. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेनं टीम इंडिया पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. घरच्या मैदानातून सुरु होणाऱ्या या मालिकेनंतर भारतीय संघ सातत्याने क्रिकेट खेळताना दिसेल. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरीसह पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत आपलं स्थान भक्कम करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.
चार महिन्यांच्या आत १० कसोटी सामने
१९ सप्टेंबरनंतर भारतीय संघाला १११ दिवसात म्हणजेच ३ महिने आणि १९ दिवसांत १० कसोटी सामने खेळायचे आहेत. कसोटी सामन्याशिवाय ५ महिन्यात टीम इंडिया ८ टी-२० सामन्यासह ३ वनडे सामनेही खेळणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या २ कसोटीसह भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे.
WTC पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपला
आगामी १० कसोटी सामन्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. सध्याच्या घडीला इंडिया ६८.५२ विनिंग पर्सेंटेजसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सर्वात आघाडीवर आहे. ९ सामन्यातील ६ विजय, २ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह संघाच्या खात्यात ७४ गुण जमा झाले आहेत.
भारतापाठोपाठ लागतो ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा नंबर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघ भारताला टक्कर देताना दिसतोय. १२ सामन्यातील ८ विजय, ३ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ९० गुण जमा आहेत. त्यांच्या विनिंग पर्सेंटेजचा आकडा ६२.५० इतका आहे. त्यांच्यापाठोपाठ ६ पैकी ३ सामन्यातील विजय आणि ३ पराभवासह न्यूझीलंडचा संघ ३६ गुण आणि ५० टक्के विनिंग पर्सेंटेजसह तिसऱ्या स्थानावर आहे.पाकिस्तान संघाचा सुरुये संघर्ष
पाकिस्तानच्या संघाला पहिल्या टॉप ५ मध्येही आपलं स्थान निश्चित करता आलेले नाही. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघानंतर ते सहाव्या क्रमांकावर आहेत. पाच कसोटी सामन्यात त्यांना २ सामनेच जिंकता आले असून ३ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या विनिंग पर्सेंटेजचा आकडा ३६.६६ इतका आहे.
टीम इंडिया यावेळी तरी गदा उचलणार का?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशशिप स्पर्धेचे हा तिसरा हंगाम आहे. भारतीय संघ पहिल्या दोन्ही हंगामात फायनल खेळला. पण त्यांना पहिल्यांदा न्यूझीलंड आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन संघाने दणका दिला. ही पराभवाची मालिका खंडीत करून चांदीची गदा उचलण्यासाठी टीम इंडिया जोर लावताना दिसेल.