गयाना : आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाने सोमवारी श्रीलंकेवर 7 विकेट राखून विजय मिळवला. जलदगती गोलंदाज शबनीम इस्मैल आणि मॅरीझने कॅप्पे यांनी श्रीलंकेच्या धावांवर वेसण घातले. त्यानंतर कॅप्पेने कर्णधार डॅन व्हॅन निएकेर्कसह अर्धशतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता तुम्हा विचाराल यात काय नवीन... कॅप्पे आणि निएकेर्क हे कपल आहेत आणि लग्नानंतर ते प्रथमच राष्ट्रीय संघाकडून खेळल्या आहेत.
100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचे सलामीचे दोन फलंदाज अवघ्या 6 धावांत माघारी परतले. मात्र, त्यानंतर कॅप्पे व निएकेर्क या जोडप्यानं 67 धावांची भागीदारी करताना संघाला विजय मिळवून दिला. कॅप्पे 44 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून 38 धावांवर माघारी परतली, तर निएकेर्क 45 चेंडूंत 2 चौकारांसह 33 धावांवर नाबाद राहिली. निएकेर्क आणि कॅप्पे यांनी जूलै महिन्यात विवाह केला. न्यू़झीलंडच्या अॅमी सॅटर्थवेट आणि ली टॅहूहू यांच्यानंतर विवाहबंधनात अडकलेले हे दुसरे महिला क्रिकेटपटूंचे जोडपे ठरले. कॅप्पने सोशल मीडियावर फोटो टाकून लग्नाची घोषणा केली होती.
प्रेटोरीया येथे 1993 साली जन्मलेल्या निएकेर्कने 1 कसोटी, 98 वन डे आणि 70 टी-20 सामन्यांत आफ्रिका संघाचे प्रतिनिधी केले आहे. 98 वन डेत तिच्या नावावर 1946 धावा आहेत आणि त्यात 9 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तिच्या नावावर 126 विकेट्सही आहेत. टी-20मध्ये तिने 29.57 च्या सरासरीने 1538 धावा केल्या आणि 50 विकेट्स घेतले आहेत. तिला 2017-18चा आफ्रिकेच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दुसरीकडे कॅप्पने 1 कसोटी, 96 वन डे आणि 67 टी-20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. वन डे आणि टी-20 मध्ये तिने अनुक्रमे 1626 आणि 700 धावा केल्या आहेत.
2017 मध्ये ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू एसली व्हिलानीने लेस्बीयन असल्याचे जाहीर केले होते. सहकारी निकोल बॉल्टनशी तिचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पार्लामेंटमध्ये समलींगी विवाहावर चर्चा झाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्याच मेगन श्कटने तिच्या सहकारीला चुंबन देत समलींगी विवाहाला होकार असल्यासंदर्भात एक फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.