अँटीग्वा : आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडच्या महिला संघाने 2017च्या वन डे वर्ल्ड कप प्रमाणे याही स्पर्धेत भारताची घोडदौड रोखली. प्रथम फलंदाजी करताना भारताचा संपूर्ण संघ 112 धावांवर माघारी परतला. सुरुवातीला झटके बसूनही इंग्लंडच्या खेळाडूंनी संयमी खेळी करताना 8 विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे दहा वर्षांनंतर ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या भारताचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात अनुभवी मिताली राजला न खेळवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या निर्णयावार टीका होऊ लागली. मात्र, बिनधास्त हरमनप्रीतने या निर्णयाचा पश्चाताप नसल्याचे उत्तर दिले.
( ICC World Twenty20 Semi Final 2 : भारताला इंग्लिश पेपर कठीण; उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात) सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, " आम्ही जो काही निर्णय घेतला, तो संघाच्या भल्यासाठी घेतला. त्यामुळे काहीवेळा ते निर्णय यशस्वी होतात, तर काही वेळा फसतात. त्यामुळे आजच्या निर्णयाचा पश्चाताप नाही. संपूर्ण स्पर्धेत ज्या पद्धतीने खेळलो, त्यावरून प्रत्येक खेळाडूचा अभिमान वाटतो. आमचा संघ युवा खेळाडूंनी भरलेला आहे आणि आजचा पराभव आम्हाला शिकवण देणारा ठरला. काहीवेळा तुम्हाला खेळपट्टीनुसार स्वतःच्या खेळात बदल करावा लागतो.''