ठळक मुद्देभारताचे ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचे लक्ष्यस्मृती मानधनाची अर्धशतकी खेळी हरमनप्रीतचीही जोरदार फटकेबाजी
गयाना : भारतीय महिलांनी आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत 'B' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचे लक्ष्य उभे केले. भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेताना 8 बाद 167 धावा केल्या. स्मृती मानधनाने तुफानी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही आक्रमक खेळी करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली.
सलग तीन विजयासह उपांत्य फेरीत स्थान पक्कं करणाऱ्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार हरमनप्रीत कौरने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी अनुभवी मिताली राजला राखून ठेवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिताली आणि मानसी जोशी यांना विश्रांती देण्यात आली. त्यांच्याजागी संघात अनुजा पाटील आणि अरुंधती रेड्डी यांना संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या एलिसी पेरीचा हा शंभरावा ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष व महिला खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. याच सामन्यात व्हॅलमनिकने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले. स्मृती आणि जेमिमा रॉड्रिग्जने दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी करताना भारताचा डाव सावरला. रॉड्रिग्ज माघारी फिरल्यानंतर हरमनप्रीतने तिसऱ्या विकेटसाठी स्मृतीला तोलामोलाची साथ दिली. दोघींनी आक्रमक खेळावरच भर दिला. स्मृती मानधनाने 31 चेंडूंत खणखणीत अर्धशतक झळकावले. त्यात 6 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. हरमनप्रीतने 27 चेंडूंत 43 धावांची खेळी केली. तिने स्मृतीसह 68 धावांची भागीदारी केली. 62 धावांवर असताना स्मृतीला पंचांनी पायचीत बाद ठरवले, परंतु तिने वेदा कृष्णमुर्तीचा सल्ला घेत डीआरएस घेतला. त्यानंतर पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. स्मृती नाबाद ठरताच भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला. व्हॅलमनिकने 16व्या षटकात वेदाचा स्वेअर लेगला अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर आलेली हेमलता दयालनही (1) लगेच माघारी परतली. त्यानंतर स्मृतीची आतषबाजी पाहायला मिळाली. स्मृतीची झुंजार खेळी 19व्या षटकात संपुष्टात आली. स्मृतीने 55 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकार खेचून 83 धावा चोपल्या.