ॲंटिग्वा: आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपले. तीन वेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने यजमान विंडीजला 71 धावांनी हार मानण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाच्या 142 धावांचा पाठलाग करताना विंडीज संघ ७१ धावांत माघारी परतला. ऑस्ट्रेलियाने सलग पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताविरुद्धच्या सामन्यात जायबंद झालेली ॲशली हिलीने फिटनेस टेस्ट पास करत कमबॅक केले. तिने कर्णधार मेग लॅनिंगसह अर्धशतकी भागीदारी करताना संघाला ५ बाद 142 धवांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. हिलीने 46 धावांची, तर लॅनिंगने 31 धावांची खेळी केली. राचेल हायनेसने 25 धावा करताना संघाच्या धावसंख्येत भर घातली.
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ पूर्णपणे ढेपाळला. कर्णधार स्टेफनी टेलर (16) वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एलिसे पेरी, डि. किमिंस आणि ए. गार्डनर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. यष्टिरक्षक हिलीला सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला.