अँटिग्वा : आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या महिलांनी पुन्हा एकदा भारतीय संघाची घोडदौड रोखली. 2017च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडनेभारताला नमवून जेतेपद पटकावले होते. आज ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडच भारी ठरला. इंग्लंडने 8 विकेट राखून भारताला पराभवाची चव चाखवली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चेंडूला गती आणि वळण मिळणाऱ्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीचा निर्णय काहीसा बुचकळ्यात टाकणारा होता. मात्र, स्मृती मानधना आणि तानिया भाटिया यांनी संघाला सकारात्मक सुरुवात करून दिली. इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करताना सुरुवातीला भारतीय फलंदाज चाचपडले. परंतु मानधनाने सर्व दडपण कमी करताना फटकेबाजी केली. मानधना 23 चेंडूंत 34 धावा करुन सोपा झेल देत माघारी फिरली.
त्यापाठोपाठ भाटियाही ( 11) बाद झाली. हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्जला खुलून खेळता येत नव्हते. म्हणून त्यांनी सुरुवातीला सावध खेळ केला. पण ही भागीदारी 36 धावांवर संपुष्टात आली. जेमिमा धावबाद झाली. 15 षटकांत भारताच्या 3 बाद 93 धावा झाल्या होत्या त्यानंतर सात फलंदाज अवघ्या 20 धावा जोडू शकल्या. भारताचा संघ 112 धावांवर तंबूत परतला.
इंग्लंडची सुरुवात फार चांगली झाली नाही. टॅमी बीमोंट (1) धावांवर बाद झाली. त्यापाठोपाठ आणखी एक धक्का दिला. पण त्यांनी सावध खेळ करताना दहा षटकांत 60 धावा केल्या. स्किव्हरचा झेल सोडणं भारताला महागात पडले. स्किव्हर आणि ए जोन्स यांनी उत्तुंग फटकेबाजीचा मोह टाळताना जमिनीलगत फटक्यांवर भर दिला. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांच्या संयमी खेळीने भारतीय खेळाडूंच्या विजयाच्या आशा संपवल्या. हरमनप्रीतसह सर्व खेळाडू हतबत दिसत होते. या दोघींनी अगदी सहजतेने इंग्लंडचा विजय पक्का केला.