ॲंटिग्वा: आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला अनुभवी मिताली राज हिची उणीव जाणवली. भारतीय महिलांना इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य उभे करण्यात अपयश आले. या सामन्यात त्यांना 19.3 षटकांत केवळ112 धावा करता आल्या.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चेंडूला गती आणि वळण मिळणाऱ्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीचा निर्णय काहीसा बुचकळ्यात टाकणारा होता. मात्र, स्मृती मानधना आणि तानिया भाटिया यांनी संघाला सकारात्मक सुरुवात करून दिली. महत्त्वाच्या सामन्यात अनुभवी खेळाडू मिताली राजचे नसणे खटकणारे होते. हरमनप्रीतने विजयी संघच कायम राखण्याचा निर्णय घेतला.
इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करताना सुरुवातीला भारतीय फलंदाज चाचपडले. परंतु मानधनाने सर्व दडपण कमी करताना फटकेबाजी केली. मानधना 23 चेंडूंत 34 धावा करून सोपा झेल देत माघारी फिरली. त्यापाठोपाठ भाटियाही ( ११) बाद झाली. भारताने दहा षटकांत 2 बाद 59 धावा केल्या होत्या.