दुबई : भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील क्रिकेट मालिकेला आयसीसीने सोमवारी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या मालिकेत जे भारतीय खेळाडू सहभागी होतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयसीसीने दिला आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये आयसीसीने अमेरिकेच्या क्रिकेट मंडळावर कारवाई केली होती. कारण त्यांनी आगामी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांबरोबर ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्याचे जाहीर केले होते. या मालिकेची घोषणा करण्यापूर्वी अमेरिकेच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळेच आयसीसीने अमेरिकेच्या क्रिकेट मंडळाला बडतर्फ केले होते.
याबाबत आयसीसीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, " या दोन्ही मालिका अधिकृत नाहीत. कारण आयसीसी आणि बीसीसीआय या दोन्ही संघटनांनी या मालिकांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या मालिकेत जे खेळाडू, प्रशिक्षक, सामनाधिकारी सहभागी होतील त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल. "
क्रिकेट विश्वामध्ये जर कोणतीही मालिका खेळवायची असेल तर त्यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांची परवानगी असणे बंधनकारक असते. त्यानंतर आयसीसीची परवानगी मिळाली तरच या दोन देशांतील मालिका अधिकृतपणे खेळवल्या जाऊ शकतात.