नवी दिल्ली : भारताचे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यादरम्यान रोटेशन पद्धतीने संधी देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. सहा सामन्यात दोघेही एकाचवेळी खेळण्याची शक्यता कमीेच आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी दोघांना ताजेतवाने ठेवायचे असल्याने हा विचार पुढे आला आहे. २७ नोव्हेंबरपासून तीन वन डे आणि त्यानंतर तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाईल. हे सर्व सामने सिडनी आणि कॅनबेरा येथे होतील.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराह आणि शमी यांच्यावरील भार कसा कमी करता येईल, यासाठी मुख्य कोच रवी शास्त्री आणि गोलंदाजी कोच भारत अरुण काळजी घेत आहेत. कसोटी मालिकेआधी भारताचा पहिला सराव सामना ६ ते ८ डिसेंबर दरम्यान खेळला जाईल.याच काळात भारतीय संघाचे दोन टी-२० सामनेदेखील रंगणार आहेत. तिसरा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याच्या जखमेची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. यामुळे बुमराह आणि शमी हे कसोटी मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे गोलंदाज असतील.
अशावेळी शास्त्री, कोहली आणि अरुण हे १२ दिवसाच्या आत सहा झटपट सामन्यात दोघांनाही एकाच वेळी खेळविण्याच्या स्थितीत नाहीत. यामुळे जोखीम वाढू शकते, असे सर्वांचेच मत आहे.बोर्डच्या एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराह आणि शमी हे तिन्ही टी-२० सामन्यात खेळेल तर, दोघांना केवळ एकच सराव सामना खेळायला मिळेल. वन डे सामन्यातही दोघांना एकाच वेळी खेळवले जाणार नाही, याचीही दाट शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी की, दोघेही वन डे सामन्यात खेळून प्रत्येकी १० षटके मारा करू शकतील.
n बुमराह आणि शमी हे टी-२० मालिकेबाहेर राहिल्यास त्यांची जागा दीपक चाहर, टी. नटराजन आणि नवदीप सैनी हे घेऊ शकतील. युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकी गोलंदाज त्यांच्या मदतीला असतील.