नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सतर्फे ३१ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी करणारा राहुल तेवतिया एक दिवस स्टार होईल, असे त्याचे बालपणीचे प्रशिक्षक विजय यादव यांनी म्हटले आहे. आयपीएलमध्ये फलंदाजीमुळे तू एक दिवस स्टार होणार, असे मी त्याला म्हणालो होतो. हरियाणाच्या फरिदाबाद येथील सिही गावात राहणाऱ्या राहुलने शेल्डन कॉटरेलच्या एका षटकात पाच षटकार ठोकत सामन्याचे चित्र बदलले. भारताचे माजी यष्टिरक्षक फलंदाज यादव म्हणाले, ‘त्याचे वडील फरिदाबाद न्यायालयात वकील आहेत. तो मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, पण मी त्याच्या कुटुंबाचा उत्साह बघितला आहे. मात्र तो लाजाळू होता.’
यादव पुढे म्हणाले, ‘त्याचे वडीलच नव्हे तर त्याचे काकाही त्याला सोडायला येत होते. अन्य आई-वडिलांप्रमाणे त्यांचा मुलगाही खेळावा, असे त्यांना वाटत होते. सर काय करीत आहेत, राहुलला खेळवत का नाहीत, अशी विचारणा करीत होते. तो क्रिकेटपटू व्हावा, असे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाटत होते.’
यादव पुढे म्हणाले,‘एका खेळाडूला स्वत:च्या क्षमतेची कल्पना असायला हवी. किशोर वयात राहुल नेहमी युजवेंद्र चहलसोबत स्पर्धा करीत होता. मी त्याला सांगितले की त्याला उपयुक्त लेग स्पिनर व्हायचे आहे. अमित मिश्रा व चहल अधिक उपयुक्त फिरकीपटू आहेत. राहुलची ताकद त्याची फलंदाजी होती आणि मी त्याला सांगितले होते की तो फलंदाजीच्या जोरावर आयपीएलमध्ये सामने जिंकेल.’
गेल्या मोसमातही तेवतियाला प्रशंसा हवी होती
राहुल तेवतियाला गेल्या मोसमात स्वत:ची प्रशंसा हवी होती. यंदाच्या मोसमात त्याला ती आपोआप मिळाली. या युवा क्रिकेटपटूचा गेल्या वर्षी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी दिल्लीतर्फे खेळणाºया तेवतियाने मुख्य प्रशिक्षक पॉन्टिंग यांना म्हटले होते की, मुंबईविरुद्धच्या विजयात त्याने चार झेल टिपले आहेत. सामन्यानंतर पॉन्टिंगने रिषभ पंत, शिखर धवन, कोलिन इंग्राम आणि गोलंदाजांची प्रशंसा केली होती. तेवतियाने त्यांना थांबवीत आपले मत मांडले होते. त्यानंतर पॉन्टिंग यांनी गमतीने संघातील सर्व खेळाडूंना सांगितले की, ‘तेवतियाने सामन्यात चार झेल टिपले असून त्यासाठी त्याची प्रशंसा व्हावी, असे त्याचे मत आहे.’
Web Title: The idea was that Tevatia would become a star
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.