नवी दिल्ली : आयपीएलपूर्वी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी होणार आहे आणि त्यामध्ये निगेटिव्ह सापडल्यावरच त्यांना यूएईला जाता येईल. तथापि आयपीएल सुरू असताना एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरी मोठे नुकसान होण्याची भीती किंग्स इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या नियमावलीचे (एसओपी) कठोर पालन व्हावे, असे त्यांचे मत आहे.
‘एखादा कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू निघाला तरी स्पर्धेला धक्का बसू शकतो. आयपीएल धोक्यात येऊ शकते. त्यामुळे यूएईच्या नियमांनुसार बीसीसीआयला वागावे लागेल. जर यूएईमध्ये कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू आढळला आणि त्यांच्या सरकारने जर आयपीएल रद्द करायला सांगितली तर बीसीसीआयकडे कोणताच पर्याय उपलब्ध नसेल, असे वाडिया यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘आमच्यासाठी खेळाडू आणि त्यांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे खेळाडूंची काळजी घेतली जाईल, त्याचबरोबर त्यांच्या योग्य त्या वैद्यकीय चाचण्याही करण्यात येणार आहेत. पण जर आयपीएल सुरू असताना एक जरी पॉझिटिव्हची केस समोर आली तर ते फार भारी पडू शकते. ’आयपीएलदरम्यान यूएईला जाण्याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. मात्र सुरक्षा नियमावलीविषयी कुठलीही हयगय करण्यात येणार नाही, असे नेस वाडिया यांनी सांगितले.