नवी दिल्ली।
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर भाष्य केले आहे. जर रविचंद्रन अश्विन सारखा प्रभावशील गोलंदाज कसोटी संघातून बाहेर होऊ शकतो तर मग मोठ्या कालावधी पासून लौकिकाला साजेशी कामगिरी करत नसलेला विराट कोहली टी-२० संघातून पायउतार झाला तर त्यात चूक ते काय?, असे म्हणत कपिल देव यांनी एकप्रकारे कोहलीने आता थोडी विश्रांती घ्यायला हवी असे संकेत दिले आहेत.
दरम्यान, कोहलीला जवळपास मागील तीन वर्षांपासून एकही मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाला पहिले विश्वविजेतेपद जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी म्हटले की, भारतीय संघात उत्तम कामगिरी करत असलेल्या खेळाडूंना आता संधी दिली नाही तर त्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी कधीच मिळणार, असे झाले नाही तर त्यांच्यावर मोठा अन्याय होईल.
अश्विन बाहेर होऊ शकतो तर मग विराट का नाही?कपिल देव यांनी एबीपी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कोहलीला आता विश्रांती देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. "जर आपण कसोटीमधील दुसरा सर्वोत्तम गोलंदाज रविचंद्रन अश्विनला बाहेर ठेवू शकतो तर जगातील एक नंबरचा फलंदाज देखील बाहेर होऊ शकतो. तसेच मलाही वाटते की कोहलीने धावा कराव्या, मोठी खेळी करावी मात्र सध्या त्याची कामगिरी निराशाजनकच राहिली आहे. याची सर्वांना कल्पना आहे. त्याने त्याच्या खेळीनेच क्रिकेट विश्वात नाव कमावले आहे. मात्र तो चांगले प्रदर्शन करत नसला तर तुम्ही नवीन खेळाडूंना बाहेर ठेवू शकत नाही", असे परखड मत कपिल देव यांनी मांडले.
विराट आणि युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले की, "मला वाटते की कोहली आणि संघातील युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा व्हावी. युवा खेळाडूंनी आपल्या शानदार खेळीने विराट समोर आव्हान उभे करावे आणि विराटने या पद्धतीने पुनरागमन केले पाहिजे युवा खेळाडूंना गर्व वाटला पाहिजे. आपण कधीकाळी जगातील अव्वल स्थानावर असलेला फलंदाज होतो असे समजून विराटने प्रदर्शन केले पाहिजे", असे देव पुढे म्हणाले.
फॉर्मच्या आधारावर संघाची निवड व्हायला हवीसंघातील प्लेइंग इलेव्हनची निवड खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारावर करायला हवी. जर संघाकडे खूप पर्याय असतील तर सध्या लयनुसार खेळत असलेल्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे. तुम्हाला फक्त प्रतिष्ठेच्या आधारावर जाता येणार नाही. त्यासाठी सध्याच्या फॉर्मच्या आधारे खेळाडूंची निवड करावी लागेल, असे कपिल देव यांनी स्पष्ट केले.