ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. आता टीम इंडियाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी अफगाणिस्तानसह अन्य संघांच्या कामगिरीवर विसंबून रहावे लागणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्ताननं १० विकेट्स राखून पराभूत केलं, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनंही ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. भारताचे स्टार खेळाडू पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरले. दोन सामन्यांत भारताला केवळ २ विकेट्स घेता आल्या आणि त्यानी जसप्रीत बुमराहनं घेतल्या.
१९८३च्या वर्ल्ड कप संघाचे कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी टीम इंडियाच्या लाजीरवाण्या कामगिरीवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी बीसीसीआयलाही सल्ला दिला. जर संघातील दिग्गज खेळाडू चांगले खेळत नसतील तर बीसीसीआयनं हस्तक्षेप करायला हवा. टीम इंडियानं या मोठ्या नावांवर अवलंबून राहण्यापेक्षा बीसीसीआयनं युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी द्यायला हवी, असेही कपिल देव म्हणाले.
''अन्य संघांच्या कामगिरीच्या जोरावर आपण यशस्वी होत असो, तर त्याचं कौतुक नक्कीच करायला नको. तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचाय, उपांत्य फेरीत प्रवेश मिळवायचाय, तर तो स्वतःच्या दमवर मिळवा. दुसऱ्या संघांवर अवलंबून राहता कामा नये. निवड समितीनं मोठ्या नावांचा आणि मोठ्या खेळाडूंच्या भविष्यावर निर्णय घ्यायला हवा,''असेही कपिल देव म्हणाले.
ते पुढे म्हणाले,''युवा खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांना राष्ट्रीय संघात संधी देण्याची वेळ आलीय का?, याचा बीसीसीआयनं विचार करायला हवा. पुढील पिढीला कसे घडवायचे?, ते पराभूत झाले, तर त्यात काही वाईट गोष्ट नाही. त्यांना अनुभव मिळणे गरजेचं आहे. जर मोठ्या नावाचे खेळाडू चांगली कामगिरी करत नसतील, तर त्यांच्यावर टीका होणारच आहे. आता बीसीसीआयनं हस्तक्षेप करून अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देण्याचा विचार करायला हवा.''
विराट कोहलीच्या विधानावर नाराजभारतीय संघाला रविवारी न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) नेमकं कुठं चुकलं हे सांगितलं आणि त्याच्या त्या वक्तव्यातील एका शब्दावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी नाराजी व्यक्त केली. ABP news शी बोलताना ते म्हणाले, विराट कोहली हा लढवय्या आहे. माझ्यामते तो या क्षणाला हरवला आहे किंवा आणखी काहीतरी झालंय. 'आम्ही पुरेसे धाडस दाखवू शकलो नाही', कर्णधारानं असं विधान करायला नको. तू देशासाठी खेळतोस आणि तुझ्यात ती तीव्रता आहे. पण, जेव्हा तू असे विधान करशील, तर तुझ्याकडे बोटं नक्कीच दाखवली जातील.