आयपीएलच्या आगामी हंगामासाठी (IPL 2025) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंना रिटेन रिलीज करण्यासंदर्भातील महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीतील एका तरतूदीनुसार पाच वेळच्या चॅम्पियन अ चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये पार पडणाऱ्या लिलावाआधी महेंद्रसिंह धोनीला ताफ्यात सामील करून घेण्यासाठीचा त्यांचा मार्ग अगदी सोपा झाला आहे. नव्या नियमानंतरची सौदा हा धोनीसाठी अगदी घाट्याचा सौदा ठरू शकतो.
धोनी पुन्हा मैदानात उतरण्याचे संकेत
आयपीएल २०२४ च्या हंगामात महेंद्रसिंह धोनी युवा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसला होता. आगामी हंगामातही त्याला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी नियमावली स्पष्ट झाल्यानंतर संघाच्या हिताच्या दृष्टिने निर्णय घेईन, असेही सांगत धोनीनं पुढच्या हंगामात खेळण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. नव्या नियमानुसार, धोनीला अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात संघात कायम ठेवणं चेन्नई सुपर किंग्सला शक्य होणार आहे. अनकॅप्ड खेळाडूसंदर्भातील नियम चेन्नई सुपर किंग्सच्या फायद्याचा असला तरी धोनीसाठी हा सौदा घाट्याचाच ठरेल.
पण MS धोनीच्या पगारात होईल मोठी घट
इएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, जर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात धोनीला संघासोबत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर धोनीचा पगार हा ४ कोटींपर्यंत मिळू शकते. ही रक्कम याआधी त्याला मिळालेल्या रक्कमेच्या १२ कोटी रुपयांच्या पॅकेजपेक्षा जवळपास ६६ टक्क्यांनी कमी असेल.
फक्त अन् फक्त धोनीसाठीच आणलाय का अनकॅप्डचा प्लेयर नियम?
आयपीएलमध्ये फक्त भारतीय खेळाडूंसाठी लागू करण्यात आलेल्या 'अनकॅप्ड प्लेयर' नियमानुसार, मागील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला कॅप्ड खेळाडू हा अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात या स्पर्धेत उतरेल. हा नियम फक्त अन् फक्त धोनीसाठी लागू करण्यात आलाय का? असा प्रश्नही काहींना पडू शकतो. पण हा नियम तसा नवा नाही. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच अनकॅप्ड खेळाडूसंदर्भातील नियम लागू होता. पण २०२१ मध्ये तो रद्द करण्यात आला होता. आता हा नियम पुन्हा लागू करण्यात आला आहे.