नवी दिल्ली - भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच कालावधीपासून सामना रंगलेला नाही. त्यामुळे या दोन्ही संघांमधील काँटे की टक्कर क्रिकेट रसिकांना कमीच पाहायला मिळते. वर्ल्डकप, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्येच भारत-पाकिस्तानचे संघ आता आमनेसामने उभे ठाकताना दिसतात. मात्र जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ समोरासमोर येतात, तेव्हा तेव्हा क्रिकेट सिकांना रंगतदार सामन्याची पर्वणी पहायला मिळते.
असाच हायहोल्टेज सामना क्रीडाप्रेमींना अंडर-19 विश्वचषकामध्ये पाहायला मिळू शकतो. पाकिस्तानने आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेटने पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. तर अंडर-19 विश्वचषकामध्ये भारताच्या युवा संघाने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळताना साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत वर्चस्व निर्माण केले आहे. भारताचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला असून येथे बांग्लादेशसोबत लढत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास उपांत्य फेरीमध्ये भारत आणि पाकिस्तानचा अंगावर रोमांच आणणारा सामना रंगणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत भारत आणि बांग्लादेशमध्ये 26 जानेवारीला सामना रंगणार आहे. युवा ब्रिगेडने बांग्लादेशचा पराभव केल्यास 30 जानेवारीला पाकिस्तानसोबत सामना होईल. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 9 बाद 189 धावांवर रोखला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे आघाडीचे चार फलंदाज 43 धावांवर माघारी परतले होते. मात्र, यानंतर वांडिले मॅकवेतू आणि जेसन निमंड यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मॅकवेतूने 60 धावांची खेळी करत एकतर्फी लढत दिली. पाकिस्तानतर्फे मोहम्मद मुसाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आफ्रिकेचे 190 धावांचे लक्ष्य पाकिस्तानने सात विकेटच्या मोबदल्यात गाठले. अली झरयब आसिफने नाबाद 74 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. साद खानने २६ धावा आणि रोहैल नाझिरने 23 धावांची खेळी करत विजयात योगदान दिले. आफ्रिकेतर्फे निमंडने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.