गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने ( Shubman Gill ) त्याला जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी संभाव्य निवडीबाबत चिंता नसल्याचे मत व्यक्त केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड व्हायची आहे आणि गिलही या शर्यतीत आहे. पण, सध्या त्याला याचा विचार करायचा नाही, कारण असेल केल्यास तो गुजरात टायटन्स संघावर अन्याय होईल, असे त्याला वाटते. “जर माझी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघासाठी निवड झाली नाही, तर मी घरूनच भारतीय संघाला चिअर करेन,” असे गिल PTI ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
शुबमन गिलने आयपीएल २०२४ मध्ये ९ सामन्यांत ३८ च्या प्रभावी सरासरीने ३०४ धावा केल्या आहेत, तो गेल्या वर्षीच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. राष्ट्रीय संघासाठी निवड होणे हा एक मोठा सन्मान असल्याचे त्याने कबूल केले असले तरी, त्याने हे मान्य केले आहे की, मैदानावर काय करता येईल यावरच त्याचे नियंत्रण असल्याचे त्याने मान्य केले.
संघात निवड होणार की नाही हे नियंत्रणाबाहेर आहे आणि ते विचार त्याला GT सोबतच्या त्याच्या जबाबदाऱ्यांपासून विचलित करू शकतात, असे गिलला वाटते. “जर मला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी निवड व्हायचीच असेल, तर ती होईल. पण सध्या, माझे लक्ष आयपीएलवर आहे आणि माझ्या संघातून सर्वोत्तम कसे मिळवायचे व माझ्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी कशी करायची, यावर आहे, ” असे तो म्हणाला.