नवी दिल्ली : आशिया चषक २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने मोठे विधान केले आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला नसता आणि संपूर्ण सामना खेळला गेला असता तर पाकिस्तानचाच विजय झाला असता, असे त्याने म्हटले आहे. खरं तर पावसाच्या कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आला अन् दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४८.५ षटकांत २६६ धावा केल्या. मात्र, पावसामुळे पाकिस्तानला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि सामना रद्द करावा लागला. दुसरीकडे शाहीन आफ्रिदीने एक अजब विधान केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केलेल्या व्हिडीओत शाहीनने म्हटले की, जर हा संपूर्ण सामना झाला असता तर पाकिस्तानी संघाने या लक्ष्याचा पाठलाग केला असता आणि विजय मिळवला असता.
शाहीननं नेमकं काय म्हटलं?
"नवीन चेंडूने संघासाठी बळी घेण्याचा माझा एकमेव प्रयत्न होता. मी ते पुन्हा केले आणि झटपट दोन बळी घेतले. यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांच्यात मोठी भागीदारी झाली. त्यावेळी हार्दिक पांड्याला बाद करणं खूप महत्त्वाचं होतं. दुर्दैवाने सामना पूर्ण झाला नाही नाहीतर निकाल आमच्याच बाजूने लागला असता. हवामानाबाबत आम्ही काहीही करू शकत नसलो तरी एका डावात आमची कामगिरी चांगली राहिली", असे शाहीनने आणखी सांगितलं.
या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने जबरदस्त गोलंदाजी करत पुन्हा एकदा भारताला मोठे धक्के दिले. शाहीन आफ्रिदीने १० षटकांत अवघ्या ३५ धावांत ४ बळी घेतले. त्याने पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांना आपल्या जाळ्यात फसवले.
Web Title: If ind vs pak match in asia cup 2023 was not called off due to rain, Pakistan would have won, says Shaheen Afridi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.