Join us  

पावसाने अडवलीय भारताची वाट, पाकिस्तान बघत होता याचीच वाट; कारण वाढणार आहे त्यांचा थाट

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पोर्ट ऑफ स्पेनमधील दुसऱ्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया जाणार असल्याची चिन्हे आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 8:02 PM

Open in App

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पोर्ट ऑफ स्पेनमधील दुसऱ्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया जाणार असल्याची चिन्हे आहेत. वेस्ट इंडिजला विजयासाठी पाचव्या दिवशी ९८ षटकांत २८९ धावा करायच्या आहेत, तर भारताला ८ विकेट्स हव्या आहेत. पण, सध्या तिथे धो धो पाऊस पडतोय आणि याचा फायदा पाकिस्तानला होणार आहे. 

भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३६५ धावांचा पाठलाग करताना आर अश्विनने चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजला धक्के बसले आहेत.  क्रेग ब्रेथवेट व तेजनारायण चंद्रपॉल यांनी सावध सुरुवात केली. आर अश्विनने प्लान आखून ब्रेथवेटला ( २८) स्वीप मारण्यास भाग पाडले अन् जयदेवने सोपा झेल टिपला. अश्विनने पुढच्याच षटकात किर्क मॅकेंझीला ( ०) पायचीत केले. चौथ्या दिवसअखेर विंडीजने २ बाद ७६ धावा केल्या होत्या.

तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावातील १८३ धावांच्या आघाडीत दुसऱ्या डावात १८१ धावांची भर घालून वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला. मोहम्मद सिराजने ६० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. रोहित शर्मा ( ५७)  व यशस्वी जैस्वाल ( ३८) यांनी दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करताना ९८ धावांची सलामी दिली. इशानने चौथ्या क्रमांकावर येताना  ३४ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या. शुबमन गिल २९ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने २ बाद १८१ धावांवर दुसरा डाव घोषित केला. 

पाकिस्तानला कसा फायदा?जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३-२५च्या हंगामाला सुरूवात झाली आहे. भारत या WTC 2023-25 मधील पहिली कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध खेळतोय आणि पहिला सामना जिंकून भारताने गुणतालिकेत १०० टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तानचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि बाबर आजमच्या संघाने पहिली कसोटी जिंकून १०० टक्के गुण कमावले आहेत. ऑस्ट्रेलिया ( ५४.१७) व इंग्लंड ( २९.१७) हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा कसोटी सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी ४ गुण दिले जातील. याचा अर्थ भारताची टक्केवारी कमी होईल आणि १०० टक्के असणारा पाकिस्तानचा संघ WTC PointTable मध्ये अव्वल स्थानी जाईल. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध वेस्ट इंडिजपाकिस्तान
Open in App