India squad for ICC World Test Championship 2023 Final - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) मंगळवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी ( WTC Final) टीम इंडियाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवचा फॉर्म अन् श्रेयस अय्यरची दुखापत यामुळे संघात अनुभवी चेहरा दिसेल हे अपेक्षित होते. तसे झालेही आयपीएल 2023 गाजवत असलेल्या अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) १७ महिन्यांनंतर कसोटी संघात पुन्हा घेण्याचा शाहणपणा BCCI ने दाखवला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर संघाबाहेर असलेल्या अजिंक्यने स्थानिक स्पर्धांमध्येही दमदार कामगिरी करून BCCIला त्याची दखल घेण्यास भाग पाडले होते. पण, बीसीसीआयने वार्षिक करारातून त्याला हटवले आहे, तरीही अजिंक्य न खचता कामगिरी करत राहिला. बीसीसीआयने अजिंक्यला संघात घेतल्याने सारेच कौतुक करत आहेत, परंतु या संघनिवडीत झालेली एक मोठी चूक सर्वच दुर्लक्षित करत आहेत.
७ ते ११ जून या कालावधीत लंडन येथील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही फायनल होणार आहे. याच्या तयारीसाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक २३-२४ मे रोजी लंडनला काही खेळाडूंना सोबत घेऊन जाणार आहे. जे खेळाडू आयपीएल २०२३ प्ले ऑफचा भाग नसतील, परंतु त्यांची WTC साठी निवड झाली असेल अशा खेळाडूंसह द्रविड आधीच लंडनमध्ये दाखल होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल यांचे संघ आयपीएलमध्ये प्ले ऑफपूर्वीच बाहेर पडले तर हे स्टारही द्रविडसोबत जातील.
बीसीसीआयने निवडलेल्या संघात रोहित, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट, अजिंक्य, लोकेश, केएस भरत हे फलंदाज आहेत. आर अश्विन, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल या फिरकीपटू-फलंदाजांचा समावेश आहे. जलदगतीचा मारा शार्दूल ठाकूर, शमी, सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट हे सांभाळतील. हा संघ नीट पाहिल्यास यात केवळ एकच स्पेशल यष्टिरक्षक आहे आणि हीच गोष्ट महागात पडू शकते. जर लोकेश राहुलचा यष्टिरक्षक म्हणून बीसीसीआय विचार करत असेल तर कसोटीत त्याला हे कितपत जमेल यात शंका आहेच... भरतला संघात घेतल्यास एका फलंदाजाचा बळी द्यावा लागेल हे निश्चित आहे अन् जर भरतला दुखापत झाली, तर रिप्लेसमेंट म्हणून यष्टिरक्षकाचा पर्याय बीसीसीआयने निवडलेलाच नाही.
दिग्गज समालोचक हर्षा भोगले यांनीही याच मुद्यावर बोट ठेवले आहे. त्यांनी ट्विट केले की, फलंदाजांची फळी मजबूत करण्यासाठी जर लोकेश राहुलचा यष्टिरक्षक म्हणून विचार केला जात असेल, तर त्याने आयपीएलमध्येही यष्टिरक्षण करायला सुरुवात केली पाहीजे. कसोटी क्रिकेट हे पूर्णपणे वेगळे आहे, परंतु त्याने यष्टिमागे उभं राहून त्याची तयारी करायला हवी.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"