India vs Australia Test, WTC FINAL 2025 Scenario: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या गाबा टेस्ट मॅचनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीची शर्यत अधिकच रोमांचक बनली आहे. या दोन संघांशिवाय दक्षिण आफ्रिकाही अंतिम फेरीत पोहोचण्याचा मोठा दावेदार बनला आहे. मात्र या तिन्ही संघांसाठी अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग सोपा असणार नाही. तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने गतवेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियालाही अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे शेवटचे दोन सामने आणि श्रीलंकेविरूद्धची मालिका ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. पण कांगारुंवर मात आणि शेजारी देश श्रीलंकेची साथ मिळाल्यास टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून बाहेर करू शकते. कसे... जाणून घ्या.
कांगारुंवर मात...
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ३ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे आणि १ पराभव पत्करला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. अशा परिस्थितीत आता या मालिकेत २ सामने शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाला कोणत्याही संघावर अवलंबून न राहता अंतिम फेरी गाठायची असेल, तर उर्वरित दोन सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. ऑस्ट्रेलिया जर दोन्ही सामने जिंकण्यात यशस्वी झाला तर थेट फायनलमध्ये आपले स्थान निश्चित करेल. तसेच भारताने या दोनही सामन्यात कांगारुंवर मात केली तर ऑस्ट्रेलिया बाहेर होईल. पण या सामन्यातील दौन पैकी एकजरी सामना ऑस्ट्रेलियाने हरला किंवा अनिर्णित राहिला तर ऑस्ट्रेलियाला पुढील श्रीलंका कसोटी मालिकेवर अवलंबून राहावे लागेल.
शेजाऱ्यांची साथ...
भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्ध उर्वरित दोनपैकी एक सामना जिंकला तर सारा खेळ श्रीलंकेवर अवलंबून असेल. भारत-ऑस्ट्रेलिया मालिका २-२ अशी बरोबरीत संपली, तर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेला व्हाईटवॉश द्यावा लागेल, तरच ते अंतिम फेरी गाठू शकतील. अशा वेळी भारताला शेजारी देश श्रीलंकेच्या मदतीने ऑस्ट्रेलियाचा 'पत्ता कट' करता येईल. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा एक जरी सामना अनिर्णित ठेवला तरीही ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होईल आणि भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका असा अंतिम सामना रंगेल.
आफ्रिकेसाठी फायनलचा मार्ग अधिक सोपा
ऑस्ट्रेलिया किंवा भारतापेक्षाही आफ्रिकेचा मार्ग अधिक सोपा आहे. कारण दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरी गाठण्यासाठी २ पैकी फक्त एका कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभूत करणे आवश्यक आहे.