Cheteshwar Pujara Team India, IND vs AUS 1st Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC Final) अंतिम सामन्याआधी भारताची शेवटची मालिका ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून (शुक्रवार) पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यातून रोहित शर्मा आधीच बाहेर झाला आहे. तसेच इतरही काही खेळाडू दुखापतींनी ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत भारतीय चाहते प्लेइंग ११ बाबत विविध अंदाज लावत आहेत. तशातच गेल्या वेळी ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा टीम इंडियाची 'द वॉल' चेतेश्वर पुजारा याने मोठी भविष्यवाणी केली आहे.
"यंदाच्या दौऱ्यात भारताला मालिका जिंकायची असेल तर यशस्वी जैस्वाल हा खूप महत्त्वाचा खेळाडू सिद्ध होईल. यशस्वी हा संघातील प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. संघ व्यवस्थापनाने त्याला खूप चांगल्या पद्धतीने तयार केला आहे. मला विश्वास आहे की देशाबाहेरच्या कसोटी मालिकांमध्ये खेळताना तो नक्कीच अप्रतिम कामगिरी करण्याची क्षमता राखतो. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी तो वाया घालवणार नाही. या मालिकेबाबत बोलायचे झाल्यास तो नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. मालिका जिंकण्यासाठी तो नक्कीच महत्त्वाचा ठरेल. कारण तो कसोटीतही आक्रमक खेळ करणारा खेळाडू आहे. जसा ऑस्ट्रेलियाकडे डेव्हिड वॉर्नर होता, तशा पद्धतीची भूमिका यशस्वी जैस्वाल टीम इंडियासाठी पार पाडू शकतो," अशा शब्दांत चेतेश्वर पुजाराने यशस्वी जैस्वालबाबत विश्वास व्यक्त केला.
"भारतीय संघासाठी बॅटिंग हा महत्त्वाचा विषय असेल. भारतात जेव्हा कसोटी मालिका झाली तेव्हाही न्यूझीलंड विरूद्ध आपल्या फलंदाजांनी वाईट कामगिरी केली. जेव्हा जेव्हा भारताने भरपूर धावा केल्या आहेत, तेव्हा सामन्यात भारत वरचढ ठरला आहे. त्यामुळे सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वाल संघाची लय सेट करू शकतो. म्हणूनच मला विश्वास आहे की तो ऑस्ट्रेलियन पिचवर नक्की यशस्वी ठरेल. ऑस्ट्रेलियासारख्या प्रतिस्पर्ध्याविरोधात खेळताना दडपण येणे स्वाभाविक आहे, पण तरीही तो मानसिकदृष्ट्या कणखर आहे, त्यामुळे तो भार पेलवून नेईल," असेही चेतेश्वर पुजारा म्हणाला.