भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीला शनिवारपासून सुरुवात होत आहे. रांची येथे होणाऱ्या या कसोटीत टीम इंडियाचेच पारडे जड मानले जात आहे. भारतानं या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यापूर्वी आफ्रिकेचे दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. केशव महाराज आणि एडन मार्कराम यांनी या सामन्यातून माघार घेतल्यानं पाहुण्यांच्या अडचणी अजून वाढल्या आहेत. याही कसोटीत टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळेल, असा विश्वास आहे. हा सामना जिंकून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवून टीम इंडिया अन्य संघांपेक्षा लै भारी ठरणार आहे.
भारताने दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेवर एक डाव व 137 धावांनी विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत द्विशतक पूर्ण केले. पुणे कसोटी विजयानंतर भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 200 गुणांची कमाई केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतानं 120 गुण कमावले होते आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामने जिंकून भारतानं 80 गुणांची भर टाकली. आता तिसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यास भारताच्या खात्यात 240 गुण होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा नियमानुसार प्रत्येक कसोटी मालिकेसाठी 120 गुण दिले जातात.
भारत या कसोटीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर तो अन्य आठ कसोटी खेळणाऱ्या संघांपेक्षा भारी ठरणार आहे. 240 गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानावरील पकड भक्कम करेल. गुणतालिकेतील अन्य आठ संघाच्या गुणांची संख्या मिळूनही भारताच्या गुणसंख्ये इतकी होत नाही. त्यामुळे रांची जिंकून भारताला लै भारी कामगिरी करायची आहे. सध्या गुणतालिकेत श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्या खात्यात प्रत्येकी 60, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या खात्यात प्रत्येकी 56 गुण आहेत. वेस्ट इंडिज आणि आफ्रिका यांना टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागल्यानं त्यांची पाटी कोरीच आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश अजून एकही कसोटी खेळलेले नाहीत.