नवी दिल्ली : स्थानिक क्रिकेटकडे पाठ फिरविणाऱ्यांना धडा शिकविण्याचा ‘बीसीसीआय’ने निर्णय घेतला. कारवाई म्हणून केंद्रीय करार नाकारला. बोर्डाच्या या निर्णयाचे समर्थ करताना माजी कर्णधार कपिलदेव यांनी, ‘काही खेळाडूंना त्रास होत असेल तर होऊ द्या, देशापेक्षा मोठे कोणीही नाही,’ असे मत मांडले.
रणजी करंडक सामन्यांचे पावित्र्य कायम राखण्यासाठी हे पाऊल गरजेचे असल्याचे कपिल म्हणाले. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बुधवारी जाहीर झालेल्या २०२३-२४ च्या केंद्रीय करारात स्थान देण्यात आलेले नाही. बोर्डाच्या या कृतीवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कीर्ती आझाद आणि इरफान पठाण यांनी खेळाडूंची बाजू घेतली, तर कपिल यांनी कोणाचेही नाव न घेता स्थानिक क्रिकेटचे महत्त्व कायम राखणाऱ्या बीसीसीआयच्या निर्णयाचे समर्थन केले.
१९८३ चा वनडे विश्वचषक जिंकून देणारे कपिल पुढे म्हणाले, ‘होय, काहींना याचा त्रास होईल. काहींच्या पोटात गोळा येईल; पण देशाहून मोठे काहीच नाही. हा फार चांगला निर्णय म्हणावा लागेल. स्थानिक क्रिकेटचा दर्जा कायम राखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी ‘बीसीसीआय’चे अभिनंदन करतो. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण होताच स्थानिक क्रिकेटकडे पाठ फिरवू लागतात हे पाहून मला वेदना होत होत्या. बोर्डाने स्थानिक क्रिकेटला महत्त्व द्या, असा खेळाडूंना आग्रह केला होता. हा संदेश आधीच द्यायला हवा होता. ‘बीसीसीआय’चे हे पाऊल स्थानिक क्रिकेट वाचविण्यासाठी आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी लाभदायी ठरणार आहे.’
दिग्गज म्हणून पुढे आलेल्या खेळाडूंनी स्वत:ची जबाबदारी म्हणून स्थानिक क्रिकेट खेळावे, असा आग्रह करताना कपिल पुढे म्हणाले, ‘या खेळाडूंना संबंधित राज्य संघांकडून खेळताना हे यश मिळाले, हे त्यांनी विसरू नये. आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी स्वत:च्या राज्य संंघासाठी नेहमी उपलब्ध राहावे, या तत्त्वावर विश्वास राखणारा मी आहे. यामुळे स्थानिक खेळाडूंना चमक दाखविण्याची आणि नवे काही शिकण्याची संधी लाभते.
याशिवाय राज्य संघटनेने सुरुवातीच्या काळात दिलेल्या सहकार्याची परतफेड करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.’
पेन्शनवाढीचा लाभ होईल
कपिल यांनी खेळाडूंच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘ज्या खेळाडूृंचे कुटुंबीय पेन्शनवर जगते, त्या खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.’
Web Title: If it hurts, let it be, no one is bigger than the country! -kapildev
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.